नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात ठिकठिकाणी वाहनचोरी करणार्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली. राहुल देवीदास मुसळे (44, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सहा लाख 65 हजार रुपये किमतीच्या 20 दुचाकी जप्त केल्या आहेत.
शहरात ठिकठिकाणी वाहनचोरी होत असल्याने चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत होते. गंगापूर पोलिस ठाण्याचे अंमलदार गिरीश महाले यांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दुचाकीचोर उंटवाडी परिसरात येणार असल्याचे समजले होते. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून रात्री नऊ वाजता संशयित राहुल मुसळेला पकडले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याच्याकडील दुचाकी चोरीची आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली. त्यानुसार पोलिस चौकशीत त्याने शहरातील काठे गल्ली, वडाळा, सिडको, उपनगरसह मनमाड येथून 20 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख, सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संजय भिसे, सचिन शेंडकर, अंमलदार भरत बोळे, महाले, रवींद्र मोहिते, मिलिंदसिंग परदेशी, गणेश रहेरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. राहुल मुसळे याच्याकडून वाहनचोरीचे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आत्तापर्यंत गंगापूर, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड व भद्रकाली पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.