उत्तर महाराष्ट्र

नाशिक : खासगी सुरक्षारक्षकांची मनमानी चव्हाट्यावर; धक्काबुक्की, अरेरावीच्या तक्रारी येऊनही कारवाई नाहीच

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह जिल्ह्यातील काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या आजूबाजूला सफारी ड्रेसकोडमधील खासगी सुरक्षारक्षक (बाउन्सर्स) घेऊन वावरतात. मात्र, हे सुरक्षारक्षक नियमबाह्य असल्याचे वारंवार आढळूनही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. शिवजयंतीच्या मिरवणुकीत दोन बाउन्सर्सने एअरगन बाळगल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधीही खासगी सुरक्षारक्षकांविरोधात अनेक तक्रारी आल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याचे दिसते.

पांढरेशुभ्र कपडे, भारदस्त एसयूव्ही कार अशी झलक दिसताच सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर पुढारी व्यक्तिमत्त्व येते. मात्र, यात बराच बदल झाला असून आता पांढरे कपडे, आलिशान कारसह सफारी किंवा काळ्या रंगाच्या टी शर्ट व पँट अशा ड्रेसकोडमधील बलदंड शरीरयष्टीच्या सुरक्षारक्षकांची भर पडली आहे. काही वर्षांपूर्वी शहरात असे सुरक्षारक्षक/बाउन्सर्स घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले हाेते. मात्र, तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी नियमावलीची तपासणी केल्यानंतर बाउन्सर्स पुरवणाऱ्या एजन्सीसह बाउन्सर्सवर कारवाई केली होती. त्यामुळे हे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले. मात्र आता राजकीय व्यक्ती, गुन्हेगारांप्रमाणेच खासगी कंपनी, बँक, रुग्णालये, शोरूम, मोठा कार्यक्रम असल्यास तेथे बाउन्सर्स मोठ्या प्रमाणात दिसतात.

गर्दी झाल्यास या बाउन्सर्सकडून अनेकदा धक्काबुक्की, अरेरावी होत असल्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. याआधीही एका कपड्यांच्या शोरूममधील बाउन्सर्सने कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बाउन्सर्स विरोधात गुन्हा दाखल आहे. तसेच शिवजयंतीच्या मिरवणुकीत बाउन्सर्स एअरगन घेऊन फिरत असल्याचे आढळल्याने दोघांसह एजन्सी चालकाविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे एका हॉटेलमध्ये ग्राहकास बाउन्सर्सने चोप दिल्याचा प्रकार घडला होता. कायद्यानुसार बाउन्सर्ससाठी वेगळी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे, काय करावे आणि काय करू नये, याचे तपशील दिले आहेत. तसेच नियमावलीनुसार त्यांना वागणे बंधनकारकही आहे. मात्र, बलदंड शरीरयष्टी कमावल्यानंतर बाउन्सर्स म्हणून वावरत काही जण इतरांना धक्काबुक्की, मारहाण, अरेरावी करत असल्याचे समोर येत आहे. काही जण परवाना नसतानाही खासगी सुरक्षारक्षक पुरवत असल्याचे चित्र आहे.

खासगी सुरक्षारक्षकांची नियमावली

खासगी सुरक्षारक्षक एजन्सी सुरू करण्यासाठी संबंधितास खासगी सुरक्षा यंत्रणा (नियमन) कायदा, २००५ नुसार परवाना घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्याचे वय १८ वर्षांवरील असावे. त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसावा. त्याची चारित्र्य पडताळणी झालेली असावी. कोणत्याही गुन्ह्याची माहिती त्यास असल्यास त्याने तातडीने पोलिसांना देणे आवश्यक असते. त्याने सुरक्षारक्षकाचे किमान १६० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच तो किमान आठवी उत्तीर्ण असावा. त्याचप्रमाणे त्याने पोलिस, कमांडो, विशेष जवान घालतात तसे गणवेश परिधान केल्यास त्यास एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. सर्वसामान्य नागरिकांना दिसेल असे स्वत:चे ओळखपत्र लावणे बंधनकारक आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT