मुंढव्यात रस्त्याची दुरुस्ती अर्धवट ; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

मुंढव्यात रस्त्याची दुरुस्ती अर्धवट ; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा :  मुंढवा गावातील कमानीशेजारी असलेल्या रस्त्यावर मागील काही दिवसांपूर्वी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर तो रस्ता पुन्हा पूर्ववत करणे आवश्यक होते. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संबंधित ठेकेदाराने या रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित केली नसल्याने अपघात होत आहेत.

मुंढवा येथील मुख्य चौक असलेल्या महात्मा फुले चौकात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी दुचाकी वाहनचालक मुंढवा गावामधील रस्त्याने जातात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर ड्रेनेजलाईन टाकून झाल्यावर रस्ता दुरुस्त न केल्याने येथून जाताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या ठिकाणी केबल वाहिनी, तसेच ड्रेनेजलाईन टाकल्यानंतर या रस्त्याची अर्धवट दुरुस्ती केली आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली असता, ते मोघम उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात मात्र तेथे उपाययोजना केली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. मुंढवा परिसर अनेक सुविधांपासून वंचित आहे. उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव अशा सुविधा शहरात ठिक-ठिकाणी आहेत. पण, दुर्दैवाने मुंढवा येथे या सुविधा अद्याप झालेल्या नाहीत. त्यातच येथील मुख्य चौकात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे स्थनिक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र  नाराजी आहे.

Back to top button