उत्तर महाराष्ट्र

नाशिक : भूल दिलेल्या डॉक्टरचा मृत्यू, संशयित दुसरी पत्नी प्रियकरासह फरार

गणेश सोनवणे

नाशिक , पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणार्‍या डॉक्टर पतीला धडा शिकविण्यासाठी त्याच्या दुसर्‍या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हॉस्पिटलमध्येच डॉक्टरला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल 33 दिवसांपासून कोमात असलेल्या या डॉक्टरचा अखेर गुरुवारी (दि. 13) उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. सतीश केशवराव देशमुख (59, रा. परीक्षित हॉस्पिटल, शिवाजीनगर, म्हसरूळ) असे मृत डॉक्टरचे नाव आहे, तर सुहासिनी देशमुख आणि अरुण कांडेकर अशी संशयितांची नावे आहेत. सध्या दोघेही फरार असून, त्यांच्यावर वाढीव कलम पोलिसांना लावावे लागणार आहे.

म्हसरूळला देशमुख यांचे परीक्षित हॉस्पिटल हे खासगी रुग्णालय आहे. यात 10 सप्टेंबरला डॉ. देशमुख यांना संशयित पत्नी सुहासिनी आणि तिचा प्रियकर अरुण कांडेकर हे रुग्णालयात आढळले होते. त्याबाबत त्यांनी दोघांना विचारणा केली असता, या दोघांचे डॉ. देशमुख यांच्याबरोबर वाद झाले होते. त्यानंतर प्रियकर निघून गेला होता, तर दुसरी पत्नी सुहासिनी डॉक्टर पतीसमवेत रुग्णालयातील विश्रांती कक्षात गेली होती. तिथे तिने डॉक्टरांना भुलीचे इंजेक्शन देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

 ही बाब डॉक्टरांनी मुलगा परीक्षितला तत्काळ सांगितल्यावर त्याने पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली होती. त्यानुसार म्हसरूळ पोलिसांत दोघांविरुद्ध डॉक्टरला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. डॉ. देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी (दि. 13) सकाळी उपचारादरम्यान डॉक्टरांचा मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून दाखल गुन्ह्यात वाढीव कलमांन्वये पोलिस पुढील तपास करणार आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT