पुणे : रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू | पुढारी

पुणे : रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : चांदणी चौकात कात्रजकडून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी आणखी एक लेन येत्या चार दिवसांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना मुंबईकडे जाण्यासाठी चार लेन मिळणार आहेत. चांदणी चौकातील पूल दहा दिवसांपूर्वी पाडल्यानंतर तेथील रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जुन्या पुलाखाली येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी दोन अशा एकूण चार लेन होत्या. कामाला वेग आल्यानंतर गेल्या आठवड्यात मुंबईहून कात्रजच्या दिशेने जाण्यासाठी साडेचार लेन, तर कात्रजकडून मुंबईला जाण्यासाठी तीन लेन बनविण्यात आल्या. त्यात आणखी एका लेनची भर पडणार आहे.

खडक फोडण्यास अडचणी

जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला अत्यंत कठीण खडक आहे. पूल पाडण्यापूर्वी एका बाजूला सुमारे दोनशे मीटर, तर दुसर्‍या बाजूला सुमारे दीडशे मीटरपर्यंत खडक आहे. तो फोडण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. सुमारे चाळीस मीटर रुंदीचा खडक फोडल्यानंतर तेथे दोन्ही बाजूला चार लेनचे रस्ते बनविता येणार आहेत. सध्या दहा-बारा मीटरचा खडक फोडण्यात आला आहे. खडक कठीण असल्याने स्फोट करून तेथील दगड काढावे लागत आहेत.

मात्र, मुंबई-बंगळुरू महामार्गावर 24 तास वाहतूक असल्याने नियंत्रित पद्धतीने स्फोट करावे लागत आहेत. सध्या रात्री साडेबारा ते एक या दरम्यान वाहतूक थांबवून स्फोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथे दिवसाआड स्फोट करून दोन दिवसांत मोकळे झालेले दगड तेथून हलविण्याचे काम केले जात असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी घटनास्थळी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. स्फोटानंतर दगड उडून लागू नयेत, तसेच रस्त्यावरही पसरू नयेत, हे लक्षात घेऊन नियंत्रित स्फोट केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोथरूडच्या बाजूला सेवारस्ता
कोथरूडच्या बाजूला सेवारस्त्याचे काम खडकापर्यंत जवळपास पूर्ण झाले आहे. मुळशीकडून येणार्‍या वाहनचालकांना नवीन रॅम्पवरून आल्यानंतर या नवीन सेवारस्त्याचा वापर करता येईल. त्यासाठी खडक फोडल्यानंतर तेथील रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. ते काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल. त्यावेळी सध्याचा रॅम्पही वाढवून जुन्या पुलापर्यंत नेण्यात येईल. त्यामुळे मुळशीकडून कोथरूडला जाणार्‍या वाहनांना महामार्गावर यावे लागणार नाही. पाषाण, बावधनकडून कोथरूडला जाणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र चार लेनचा सेवारस्ता याचवेळी बनविण्यात येईल.

सातार्‍यासाठी स्वतंत्र पूल
पाषाणहून सातार्‍याकडे जाणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी सातारा रस्त्यावरील पूल बांधून पूर्ण झाला आहे. खडक फोडल्यानंतर तेथे पुलाचे दोन खांंब उभारले जातील. त्यामुळे नवीन पुलावरून पाषाणहून सातार्‍याकडे वाहने थेट जाऊ शकतील. दोन खांबांपैकी पहिल्या खांबाचा पाया खोदण्यास सुरवात झाली आहे.

पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण
येथे 15 ते 20 पॉइंटवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी या पोलिसांमुळे वाहतुकीची कोंडी होत नाही. वाहनचालकांना या पोलिसांकडून मार्गदर्शन होत असल्याने या भागातील वाहतूक सुरळीत सुरू राहिली आहे.

नियंत्रित स्फोट करून खडक फोडण्यात येत असून, पाषाण बाजूला निम्मे काम, तर एनडीए बाजूचे 25 टक्के काम झाले आहे. येत्या चार दिवसांत सातारा बाजूने मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी एक जादा लेन उपलब्ध करून दिली जाईल. कोथरूडकडून वारजेकडे जाणार्‍या सेवारस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

                  – अंकित यादव, उपव्यवस्थापक (तांत्रिक), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

Back to top button