उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ब्रेक निकामी झालेल्या बसला वाहन निरीक्षकाने रोखले, असा टळला अपघात

गणेश सोनवणे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पेठ रोडवर आरटीओ पथकाची रात्री वाहन तपासणी सुरू असताना नाशिककडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याचे कर्तव्य बजावत असलेल्या मोटार वाहन निरीक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी वेगात असलेल्या बसच्या चाकात दगड टाकून तिला थांबवत संभाव्य अपघात टाळला. खाकी वर्दीतील माणुसकी यावेळी सर्व प्रवाशांनी अनुभवली आणि गुजरातच्या प्रवाशांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.

पेठ-गुजरात महामार्गावरील कपूरजिरा (पेठ) येथे मंगळवारी रात्री प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक वाहनांची तपासणी करीत होते. १२.३० च्या सुमारास गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे ब्रेक निकामी झाल्याचे मोटार वाहन निरीक्षक समीर शिरोडकर यांना लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वाहन तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेगात असलेल्या बसच्या चाकाखाली दगड टाकून थांबविण्याचे प्रयत्न सुरू केले. बस थांबत नसल्याचे पाहून बसमधील सर्व प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. आरटीओ पथकाने वेगाने आपले वाहन बसच्या पुढे पळवत रस्त्यांवर दगड टाकल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि बस कशीबशी थांबली. बसमधील सुमारे ३० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यात लहान मुले, वृद्धांसह स्त्री-पुरुष यांचा समावेश होता. या सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या चहापाण्याची व नाश्त्याची व्यवस्था शिरोडकर यांनी केली. तोपर्यंत नादुरुस्त असलेल्या ट्रॅव्हल्स बसची दुरुस्ती करण्यासाठी मेकॅनिक यांना घटनास्थळी बोलावून दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर ही बस गुजरातच्या दिशेने रवाना झाली.

दरम्यान, ही खासगी ट्रॅव्हल बस गुजरात राज्यातील असल्याने खाकी वर्दीतील माणुसकी यावेळी सर्व प्रवाशांनी अनुभवली. वेळीच खाकीतला देवमाणूस मदतीला धावून आल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. कर्तव्य बजावत असताना अधिकारी व कर्मचारी वर्ग दक्ष असल्यास, मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते. हेच या घटनेमुळे सर्वांच्या समोर आले असून, मोटार वाहन निरीक्षक समीर शिरोडकर व त्यांच्या पथकावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT