दिंडोरी : गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सरपंच, व्याख्याते भास्करराव पेरे पाटील. (छाया: समाधान पाटील) 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य – भास्करराव पेरे पाटील

अंजली राऊत

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
गावांचा खरोखरच विकास करायचा असेल तर गावपातळीवरील नेत्यांनी दोन दिशेला तोंड न करता एकत्रित येऊन कामकाज करावे व विविध क्षेत्रातील मार्गदर्शक असणारे शिक्षक, पुढारी, पत्रकार, कीर्तनकार यांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ठाम भूमिका घेतल्यास समाजस्वास्थ बिघडणार नाही, उलट विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील पाटोदा येथील सरपंच, व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

मोहाडी तालुका दिंडोरी येथे कर्मयोगी एकनाथ जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोहाडी महोत्सव कार्यक्रमानिमित्त सरपंच, उपसरपंच व सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, सरपंच व ग्रामसेवकांनी मनावर घेतल्यास गावांचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. पिण्यास स्वच्छ पाणी, गावात मोठ्या प्रमाणात फळझाडे लावणे, चांगले शिक्षण देणे, वयोवृद्ध निराधार व्यक्तींना दत्तक घेऊन संभाळणे, आरोग्य, रस्ते, शिक्षण, सुविधा देण्याच काम सरपंच व ग्रामसेवकाने केल्यास ते गाव नक्कीच आदर्श होईल. याचा अनुभव त्यांनी स्वतःच्या गावावरून सांगितला. सरपंच हा फक्त चांगला असून चालत नाही तो खमक्या कामाचा असावा. शिक्षण हे फक्त नोकरीसाठी मिळविण्यासाठी विचारात न घेता तर त्याचा उपयोग उद्योग व व्यवसायासाठी करावा. गावचा सरपंच पद हे खूप मोठे पद असून मोठेपणासाठी सरपंच होण्याऐवजी कामे करून मोठे झाले पाहिजे. युवकांनी नोकरी सोबतच व्यवसायाकडे कल ठेवावा. चहा विक्री करणारा हजारो रुपये रोज कमवितो. पेरे पाटील यांनी त्यांच्या गावांत राबविण्यात आलेल्या विविध योजना व उपक्रम याबाबतची सविस्तर माहिती दिली. कर्मयोगी कै. एकनाथ जाधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख यांनी प्रास्तविक केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्वागतपर मनोगतात कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा मविप्रचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी उपस्थित मान्यवर व तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सरपंच, उपसरपंच व सदस्य व नागरिक यांचे स्वागत केले. परिसराचा एकसंघ विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून गावागावातील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना कामकाज करण्याची माहिती मिळावी, मार्गदर्शन मिळावे या हेतूने रविवार, दि.19 सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी मार्गदर्शन केले. के. आर. टी. हायस्कूलच्या गितमंचाने स्वागतगीत गायले. व्यासपीठावर दिंडोरी कृउबा समितीचे उपसभापती अनिल दादा देशमुख, शिवसेना तालुका अध्यक्ष पांडुरंग गणोरे, कादवा माजी संचालक शिवाजी जाधव, दत्तात्रय जाधव, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव अपसुंदे, दिलीपराव जाधव, प्रमोद शेठ देशमुख, मविप्र संस्थेचे माजी सेवक संचालक आर. एल. पाटील, बाबुशेठ बागमार, सुखदेव कदम, एस. एल. पाटील, नरेंद्र जाधव, रामराव कदम, सरपंच सौ. आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, मुख्याध्यापक बाळासाहेब अडसरे, राजेंद्र परदेशी, प्राचार्य दिनेश उफाडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते उपस्थित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. धनंजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक कैलास कळमकर यांनी आभार मानले.

* सरपंच कशासाठी झालो हे ५ वर्ष ज्याला समजत नाही त्या सरपंचाचा गावाला काहीएक उपयोग नाही.
* चांगले काम होत असताना गावातील काहींना ते बघवत नाही, अशांकडे दुर्लक्ष करण्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT