शिवसेनेच्या वाट्याला किती जागा, हे आत्ताच ठरविण्याचे कारण नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

शिवसेनेच्या वाट्याला किती जागा, हे आत्ताच ठरविण्याचे कारण नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : भाजप गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती जागा जातील, हे आत्तापासून ठरविण्याचे कारण नाही. शिवसेनेला आमची तयारी उपयोगी पडेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 19) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

पाटील हे आज पिंपरी-चिंचवड शहर दौर्‍यावर आले होते. त्या दरम्यान त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरी-मासुळकर कॉलनी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर आणि नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्या वेळी ते बोलत होते. भाजप विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढविणार आहे. तर, शिवसेनेला 48 जागा दिल्या जातील, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. दोन दिवसापूर्वी त्यांचा याबाबतचा व्हिडिओ आहे.

त्या पार्श्वभूमीवर पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. पाटील म्हणाले, भाजपाकडून एक निवडणूक झाली की दुसऱ्या निवडणुकीची तयारी करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही 288 विधानसभा आणि 48 लोकसभेच्या जागांसाठी तयारी करत आहोत. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला ज्या जागा असतील त्याबाबत आत्तापासून ठरविण्याचे कारण नाही. शिवसेनेला आमची तयारी उपयोगी पडेल.

सरकारी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक
सरकारी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी 3 निवृत्त आयएएस अधिकार्‍यांची समिती नेमली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे देखील संपात सहभागी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. मात्र, त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांचे हाल होत आहेत.

संबंधित कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावुन काम करणे अपेक्षित होते. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ असल्याने तसेच, रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने संपकरी कर्मचार्‍यांनी कामावर परत यावे. जुन्या पेन्शन योजनेमुळे सरकारवर येणारा अतिरिक्त ताण व अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे.

Back to top button