आंदर मावळातील आंब्यांच्या बागांचे नुकसान | पुढारी

आंदर मावळातील आंब्यांच्या बागांचे नुकसान

टाकवे बुद्रुक : मागील चार ते पाच दिवसांपासून सतत बदलत असलेल्या हवामानामुळे आंदर मावळात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची ज्वारी, गहू, हरभरा, वाल, वांगी, फरसबी, काकडी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, आंब्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांचे नुकसान
तसेच, भोयरे, टाकवे बुद्रुक, निगडे येथील आंब्याच्या बागाचीदेखील मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. आंब्याची झाडे फुलोर्‍यांनी भरदार भरलेली पाहायला मिळत होती. बदलत्या हवामानमुळे शेतकरी वेळेवर औषध फवारणीदेखील करत होते. या वर्षी या बागेतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अशा बळीराजाला होती; परंतु दोन दिवसांपूर्वी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे आंब्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे.

जनावरांचा चारा भिजला
आंदर मावळ हा दुर्गम, डोंगराळ भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. अनेकांच्या संसाराचा गाडा शेतीवर अवलंबून आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. तसेच, शेतकर्‍यांनी जनावरांसाठी वर्षभर पुरेल इतका ठेवलेला चारादेखील भिजला आहे. पावसामुळे परिसरातील वीटभट्टी कारखान्यांचे नुकसान झाले आहे.

आंदर मावळात झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी अधिकार्‍यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी. तसेच, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी.

                                                  – बळीराम भोईरकर, शेतकरी

Back to top button