उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रोकड-दागिन्यांसह फरार वधू पोलिसांच्या ताब्यात

गणेश सोनवणे

चांदवड pज. नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने नांदेड जिल्ह्यातील 'बबली'च्या नातेवाइकांना अडीच लाख रुपये व सोन्याचे दागिने देत थाटामाटात बबलीशी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या १८ दिवसांत बबलीने मावशी आजारी पडल्याचे कारण देत पळ काढला. त्यानंतर पुन्हा सासरी नांदण्यास बबली आलीच नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुण शेतकऱ्याने वडनेर भैरव पोलिसांत फिर्याद दिल्याने फरार बबलीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. चौघा आरोपींना चांदवड न्यायालयात नेले असता न्यायाधीश एस. बी. माने यांनी सोमवारपर्यंत (दि.७) पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली.

'शेतकरी नवरा नको गं बाई' असे म्हणत तरुणींनी विवाहासाठी नोकरदार, व्यावसायिक तरुणांना पसंती दिली आहे. यामुळे शेतकरी पुत्रांचे लग्न जुळणे मोठे अवघड झाले आहे. यामुळे चांदवड तालुक्यातील एका ३२ वर्षीय शेतकरी तरुणाने पुरी येथील एका व्यक्तीला लग्नासाठी वधू शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार मध्यस्थीने नांदेडच्या एका पाहुणीने अनेक लग्न जमवल्याचे सांगितले. त्यासाठी तिला अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर वर व वधू यांचे एकमेकांना मोबाइलवर फोटो पाठवले. पसंतीनंतर नियोजित वधू बेबी शिवाजी जगताप, तिची बहीण अश्विनी पाटील व मावशी संगीता (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघी तालुक्यातील मध्यस्थीच्या घरी आल्या. त्यावेळी फिर्यादी तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांसह व नातेवाइकांनी बेबीला पसंत केले. त्यानुसार २० एप्रिल २०२३ रोजी दोघांचे थाटामाटात लग्न लागले. या मोबदल्यात बेबीची मावशी संगीता व बहीण अश्विनी यांना सरपंचासमोर अडीच लाख रुपये रोख व ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ९८ हजार रुपये दिले होते.

लग्नानंतर बबली ऊर्फ बेबी ही अवघे १८ दिवस गुण्यागोविंदाने राहिली. त्यानंतर नाशिकची मावशी आजारी पडल्याचे वारंवार सांगत असल्याने शेतकऱ्याने तिला नाशिक शहरातील लवटेनगर अनुराधा थिएटरमागे वास्तू पार्क येथे आणून सोडले. त्यानंतर तिने मावशीला भेटून येते, असे सांगितले मात्र परतलीच नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली.

तिघींचाही चांदवडमध्येच वावर

योगायोगाने गुरुवार (दि.३) चांदवडला बबली, तिची बहीण व मावशी संगीता हे फिरताना आढळले. त्यांना चांदवड पोलिसांनी शिताफीने पकडून वडनेर भैरव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बबली ऊर्फ बेबी शिवाजी जगताप, तिची बहीण अश्विनी पाटील, मावशी संगीता व तालुक्यातील मध्यस्थी यांना वडनेर भैरव पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई वडनेर भैरव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन यांनी केली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT