उत्तर महाराष्ट्र

नाशिक : निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक, मोठा अनर्थ टळला

गणेश सोनवणे

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

मध्य रेल्वेच्या निफाड स्थानकाजवळील निफाड शिवडी रेल्वे गेटला मालवाहू ट्रकची धडक बसून रेल्वे गेटचे आणि रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे नुकसान झाले. मंगळवार (दि. ७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये काही काळ व्यत्यय निर्माण झाला मात्र सुदैवाने अपघाताच्या वेळेस कोणतीही रेल्वे गाडी तेथून जात नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. रात्री उशिरा रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.

निफाड पोलिसांकडून याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेट रस्त्यावरील वाहतुकीसाठी उघडण्यात आला होता. यावेळेस टाटा आयशर क्रमांक 41 एटी 9090 या वाहनाच्या वाहन चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून रेल्वे गेटला जोरदार धडक दिली. त्यामुळे रेल्वे गेट चा लोखंडी खांब हा रेल्वेला वीज पुरवठा करणाऱ्या अतिउच्च दाबाच्या तारांना धडकला. या घटनेत मोठा आवाज होऊन वीज पुरवठा खंडित झाला. अपघात झाल्यामुळे वाहनाचा चालक हा वाहन तेथेच सोडून पळून गेला.

अपघाताचे वृत्त कळताच मध्य रेल्वेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा दलाने संबंधित वाहन ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध चालू आहे. या अपघातामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबले, पो. ना. बिडगर, खांडेकर यांनी  योग्य वाहतुक नियोजन करुन वाहतुक सुरु केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT