उत्तर महाराष्ट्र

नाशिक : हल्ला करण्याच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पास्ते येथील घटना

गणेश सोनवणे

नाशिक सिन्नर : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील पास्ते येथे इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून चार वर्षांच्या मादी बिबट्याला बाजेच्या सहाय्याने विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले.

पास्ते येथील राणू आईचा मळ्यात वसंत पुंजाजी आव्हाड हे त्यांच्या शेतातील विहिरीवर पाणी काढत असताना बांधाच्या आडून बिबट्या दबा धरून बसला होता. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र, वसंत आव्हाड यांनी हातातील छत्री उघडून स्वत:चा बचाव केला. हल्ला अयशस्वी झाल्याने बिबट्या पळ काढत असताना शेजारील सुभाष पुंजाजी आव्हाड यांच्या मालकी क्र. १०४ मध्ये असलेल्या विहिरीत जाऊन पडला. वसंत आव्हाड यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी जमा झाले. यावेळी गोरख देवराम आव्हाड, नामदेव भीमा आव्हाड, प्रकाश श्रीरंग आव्हाड, कुंडलिक भगत, गणेश केशव घुगे, अनिल जगन आव्हाड, राजेंद्र विठोबा आव्हाड, संजय आव्हाड आदींनी आव्हाड यांना धीर दिला.

दरम्यान घडलेली घटना सामाजिक कार्यकर्ते गणेश घुगे यांनी सिन्नर वनविभागाला कळवली होती. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. जाधव, वनपाल बोकडे, वनरक्षक संजय गिते, गोविंद पांढरे, बालम शेख, राजाराम उगले यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी जास्त असल्यामुळे बिबट्याने विद्युत मोटारीचा पाइप व मोटार तरंगण्यासाठी वापरलेल्या वायरलुपचा आधार घेतला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून चार वर्षांच्या मादी बिबट्याला बाजेच्या सहाय्याने विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. मादी बिबट्याच्या पोटाला जखम असून, पुढील उपचारासाठी त्याला नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली.

बिबट्याच्या डरकाळ्या, नागरिकांची गर्दी

शेतकऱ्यावर हल्ला करण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याने जिवाच्या आकांताने डरकाळ्या सुरू केल्याने परिसर दणाणून गेला. विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी समजताच नागरिकांनी गर्दी केली. ग्रामस्थांनीही बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT