सोलापूर : सौर ऊर्जेतून रेल्वे विभाग करणार विजेची बचत

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेकडून सोलापूर विभागातील उस्मानाबाद, बार्शी, वडशिंगे, सलगरे, पारेवाडी, मोहोळ, तिलाटी या ठिकाणी असलेल्या रेल्वेच्या वापरात नसलेल्या जागेवर सौरऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वीज बचत होण्यास मदत होणार आहे.
सोलार प्लांट बसविण्यासाठी मध्य रेल्वे सुमारे 2,694 एकर मोकळ्या किंवा वापरात नसलेल्या रेल्वे जमिनीवर हा प्रकल्प उभारणार आहे. सौरऊर्जेचा वापर करणे आणि रेल्वेचे कार्बन फूटप्रिंट कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्वच्छ ऊर्जेप्रती आपली वचनबद्धता बळकट करत मध्य रेल्वे विविध ठिकाणी एक मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार आहे.
मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडात लक्षणीय घट
मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळाला तडे गेल्याने आणि रेल्वे इंजिनमध्ये होणारे बिघाड यामुळे या मार्गावरुन धावत असलेल्या लोकल आणि एक्स्प्रेस सेवा वारंवार विस्कळीत होत असे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. गेल्या वर्षी एप्रिल-जूनच्या तुलनेत यंदा सिग्नल यंत्रणा बिघाडांत 27.54 टक्क्यांनी घट झाली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर या पाच विभागांमध्ये एक एप्रिल ते 12 जुलै 2022 या कालावधीत वारंवार बिघाड होते. या काळात तांत्रिक बिघाडाचे प्रमाण 59.67 टक्के होते. यावर उपाययोजना करण्यात आली असून यंदा याच कालावधीत तांत्रिक बिघाडांचे प्रमाण 27.54 टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच गेल्या वर्षी सिग्नल बिघाडांची 177 प्रकरणे घडली होती. यंदा 124 प्रकरणे घडली असून, त्यात 29.94 टक्क्यांनी घट झाली आहे.
सोलापूर विभागातील या स्थानकांवर उभारण्यात येणार प्रकल्प…
उस्मानाबाद – 20 किलोवॅट
बार्शी शहर – 15 किलोवॅट
वाडसिंगे – 10 किलोवॅट
सलगरे – 15 किलोवॅट
पारेवाडी – 10 किलोवॅट
मोहोळ – 10 किलोवॅट
तिलाटी – 10 किलोवॅट