उत्तर महाराष्ट्र

नाशिक : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोहिमेत 18 लाख 55 हजाराचा दंड वसूल

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पर्यावरणावर प्लास्टिकमुळे होणारे परिणाम आणि प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिक शहर टास्क फोर्सकडून शहरात प्लास्टिक बंदीबाबत अनेक उपाययोजना करूनही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर सुरूच आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मोहीम राबविली जात असून, गेल्या 10 महिन्यांत 2,024 किलो प्लास्टिक जप्त करत 18 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

दरम्यान, या कारवाईत सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे गणेशोत्सव आणि दिवाळी उत्सवातच सुमारे एक हजारांहून अधिक प्लास्टिक दुकानदार, व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने 2021 मध्ये सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम कायदा संमत केला असून, त्यानुसार देशभरात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह इतर प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली. नाशिकमध्येही या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. मनपाच्या टास्क फोर्समार्फत प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून, तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची पहिली बैठक झाल्यानंतर प्लास्टिक वापर, विक्री, साठवणुकीचा आढावा घेण्यात आला होता. प्लास्टिक प्रतिबंधित वस्तू आणि सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, बाउल, डबे यावर आता बंदी राहणार आहे. प्रतिबंधित प्लास्टिक मग ते कितीही जाडी अथवा लांबीचे असो त्याचा वापर, विक्री, साठवणूक मनपा कार्यक्षेत्रात प्रतिबंधित करण्यात आले आहे. प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने नागरिक, संस्था, विविध आस्थापना, दुकाने, हॉटेल्स, खानावळ, दूध व भाजी विक्रेते अन्य सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये कोणत्याही प्लास्टिकचा वापर किंवा साठवणूक करता येणार नसल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.

गुन्ह्याचे स्वरूपाुनसार दंडाची रक्कम व स्वरूप असे…
पहिला गुन्हा – पाच हजार रुपये
दुसरा गुन्हा – दहा हजार रुपये
तिसरा गुन्हा – 25 हजार रुपये व 3 महिने कारावास

महिनानिहाय दंडवसुली व जप्त प्लास्टिक
जानेवारी – 1,95,000 86 किलो
फेब्रुवारी – 80,000 45 किलो
मार्च – 1,95,000 95 किलो
एप्रिल – 55,000 22 किलो
मे – 2,65,000 295 किलो
जून – 1,15,000 57 किलो
जुलै – 1,85,000 293 किलो
ऑगस्ट – 2,10,000 113 किलो
सप्टेंबर – 1,70,000 496 किलो
ऑक्टोबर – 3,85,000 522 किलो
एकूण – 18,55,000 2024 किलो

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT