उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिनाभरापासून पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सततच्या या पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने ग्रामीण भागातील 217 ग्रामीण व जिल्हा रस्त्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी 68 कोटींचा निधी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून रस्त्यांच्या या परिस्थितीबाबतचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे.

जुलै आणि ऑगस्टमधील सलगच्या पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नदीनाल्यांना आलेल्या पुरात रस्ते वाहून गेले असून, काही ठिकाणी रस्त्याची खडी, डांबर निघून गेल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही भागात रस्तेच पूर्णत: उखडून गेले आहेत. त्यामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. गाड्यांचे नवीन टायर महिनाभरात गुळगुळीत होत आहेत. सलगच्या पावसामुळे रस्त्यांच्या या दुर्दशेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथील विभागीय बैठकीत मुद्दा उपस्थित केला. पंधरा दिवसांमध्ये रस्त्यांबद्दलचे अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्यभरातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेने 15 तालुक्यांतील रस्त्यांबद्दलचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे नुकताच सादर केला आहे. या अहवालानुसार आदिवासीबहुल सुरगाणा, इगतपुरी, पेठ, कळवण या तालुक्यातील रस्त्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 184 ग्रामीण, तर 33 जिल्हा मार्गांना पावसाने तडाखा दिला आहे. या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी किमान सात कोटी रुपयांची आवश्यकता असून, संपूर्ण दुरुस्तीसाठी 68 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे.

लासलगावी रस्ता बनला खड्डामय : लासलगाव : येथील श्री महावीर विद्यालय ते कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने विद्यार्थ्यांना येथून मार्ग काढणे कठीण होऊन बसले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातही महाविद्यालय रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर चिखल साचला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत. रस्त्याची दुरवस्था दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT