गोवा : अरेरे..! खुनाला नाही फुटली वाचा; कळंगुट किनार्‍यावर आढळला होता अर्धनग्न मृतदेह

गोवा : अरेरे..! खुनाला नाही फुटली वाचा; कळंगुट किनार्‍यावर आढळला होता अर्धनग्न मृतदेह

पणजी; पुढारी वृत्तसेवा : कळंगुट समुद्रकिनार्‍यावर 12 ऑगस्ट 2021 रोजी अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडलेल्या 19 वर्षीय सिद्धी नाईकच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद केलेल्या व त्यानंतर अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवलेल्या या प्रकरणाचे सत्य मात्र समोर आणण्यात पोलिस कमी पडले. सिद्धीचा खुनी सापडला नसल्याने वर्षभरानंतर या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली आहे. योग्य प्रकारे तपास न झाल्याने सिद्धी नाईक हिला न्याय मिळालाच नाही, अशी भावना व्यक्त होत आहेत.

सिद्धीने समुद्रात आत्महत्या केली तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत कसा सापडला? हळदोण्यातील घराकडून ती कळंगुटला कशी पोचली? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यात पोलिसांना अपयश आले. ही घटना घडल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती व सिद्धी नाईक हिला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरात लोकांनी आंदोलने केली होती. सिद्धीच्या वडिलांनी आपली मुलीचा खूनच झाल्याचे वारंवार सांगितल्यानंतर व लोकांनी पोलिसांवर दबाव वाढवल्यानंतर कळंगुट पोलिसांनी 28 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करावा लागला.

शवविच्छेदन तपासणीत पाण्यात बुडल्यामुळे श्वासोच्छ्वास गुदमरल्यामुळे सिद्धीचा मृत्यू झाला. तथापि, तिचे वडील संदीप नाईक यांनी सप्टेंबरमध्ये अज्ञाताविरुद्ध खुनाची तक्रार दाखल केली होती. कळंगुट समुद्रकिनार्‍यावर बळजबरीने तिला समुद्राच्या पाण्यात बुडवून तिचा खून करण्यात आल्याचा दावा त्यांनी या तक्रारीत केला होता. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले होते की, गोवा पोलिस सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाची गुणवत्तेच्या आधारावर चौकशी करत आहेत. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेशन विभागाकडे सोपवले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी 40 लोकांची जबानी घेतली होती. या जबानीत कुणीच सिद्धी नाईक हिचा खून झाल्याचे सिद्ध करू शकले नाही. पोलिसांनी 8 दिवसांनी घटनास्थळी आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज शोधले होते. त्यात काहीच सापडले नव्हते. गोमेकॉच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटने पोलिसांना जो सिद्धीच्या मृत्यूचा अहवाल दिला, त्यामध्ये हत्येचा संशय नव्हता. ती बुडून मेल्याचे म्हटले होेते. तसेच पोलिसांना शोधूनही खुनाचे काहीच पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे शेवटी पोलिसांनी हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे गुन्हे अन्वेषणच्या अधिकार्‍याने सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news