पुणे : पुढारी वृत्तसेवा: अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज ते डेक्कन मेट्रो स्टेशन, अशी पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेजपासून पुढे शिवाजीनगर न्यायालय स्टेशनपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानुसार पुण्यात वनाज कोथरूड ते गरवारे कॉलेज, तर पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिका स्टेशन ते फुगेवाडीपर्यंत मेट्रो कार्यान्वित झाली.
आता अवघ्या सहा महिन्यांत दोन्ही शहरांतील मेट्रोची धाव आणखी पुढे गेली आहे. स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत सोमवारी मार्गिका क्र. 1 वर फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन आणि मार्गिका क्र. 2 वरील गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत अशी ट्रायल रन घेण्यात आली. या वेळी दोन्ही बाजूंनी ही ट्रायल रन यशस्वी झाल्याचा दावा महामेट्रो प्रशासनाकडून करण्यात आला. दोन्ही गाड्यांचा ट्रायल रनचा वेग 15 किमी प्रती तास इतका होता आणि तो नियोजनाप्रमाणे पूर्ण झाला.
या वेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, 'आम्ही येत्या काही महिन्यांत मेट्रोचे उर्वरित मार्ग सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहोत.'
स्वातंत्र्यदिनी 70 हजार प्रवासी
स्वातंत्र्यदिनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 70 हजारांहून अधिक लोकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. मागील दैनंदिन प्रवासी रेकॉर्ड प्रतिदिन 67,280 प्रवासी होते. मोठ्या संख्येने शालेय मुले, ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक गट, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी यांनी मेट्रोने प्रवास करणे
पसंत केले.