नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या वर्षी पावसाळ्यात त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नलजवळ रिक्षावर वृक्ष कोसळून रिक्षाचालकासह प्रवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यातून धडा घेत मनपा उद्यान विभागाने मान्सूनपूर्व तयारी करत सहाही विभागांतील धोकादायक व वाळलेली ११० वृक्ष तोडून नागरिकांवरील संकट दूर केले आहे. तसेच ज्या वृक्षांचा धोकादायक विस्तार झाला होता, त्यांच्या फांद्यांची छाटणी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक वृक्षांची गणना केली जाते. त्यानंतर त्याची छाटणी करायची की तोडायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे जुनी झाडे ही खूपच धोकादायक ठरतात. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. पावसाळ्यात अनेकदा वादळी वाऱ्यामुळे धोकादायक वृक्ष अचानक पडण्याची भीती असते. विशेषत: शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष आहे. काही वृक्ष दुभाजकांमध्ये आहे. ती खूपच धोकादायक ठरू शकतात. उद्यान विभागाने सहाही विभागांतील धोकादायक ठरणारी ११० वृक्ष तोडले आहेत. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ३८ वृक्ष तोडले आहेत. दरम्यान, विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता वृक्ष छाटले जातात. पश्चिम विभागात सर्वाधिक ५४९ वृक्षांच्या फांद्या छाटण्यात आल्या.
हेही वाचा :