नंदुरबार

PM मोदींचे डॉ. हिना गावित यांच्यासह 6 खासदारांसमवेत स्नेहभोजन

गणेश सोनवणे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ. हिना गावित यांच्यासह मोजक्या सहा खासदारांसमवेत स्नेहभोजन केले आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडून मतदार संघात केलेल्या विकास कामांची माहिती घेत दिलखुलास राजकीय गप्पा करीत सुखद धक्का दिला. पंतप्रधानांसमवेत सहभोजनाचा हा सन्मान प्राप्त झालेल्या डॉ. हिना गावित या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव महिला खासदार आहेत.

खासदार डॉ. हिना गावित यांच्या मोबाईलवर आज अचानक पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि "पी एम साहेबांनी बोलावलंय; ताबडतोब उपस्थित व्हा" असा निरोप पलीकडून देण्यात आला. हा निरोप ऐकताच खासदार डॉक्टर हिना गावित विचारात पडल्या आणि आपल्या हातून काय घडले असावे, का बोलावले असावे यावर विचार करीत त्या ताबडतोब पंतप्रधान कार्यालयात धावतच उपस्थित झाल्या. तिथे अन्य मोजके पाच खासदार देखील बोलावण्यात आले होते आणि त्यांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. परंतु पुढल्या काही क्षणात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समोर उपस्थित झाले आणि सर्वांना धक्का देणारा घटनाक्रम सुरू झाला.

खुद्द आपले हेडमास्टर समोर उभे आहेत म्हटल्यावर या खासदारांची मनातून घालमेल सुरू होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं हसून स्वागत केलं तेव्हा या सर्वांना धीर आला. काही औपचारिक वाक्य बोलून झाल्यावर "चला आपल्याला एका ठिकाणी जायचे" असे म्हणून पंतप्रधान मोदीजी स्वतः पुढे चालू लागले.. त्यांच्या मागून खासदार डॉक्टर हिना गावित आणि अन्य खासदार अधिक काही न बोलता चालू लागले. चालत चालत त्या मोजक्या खासदारांना घेऊन मोदीजी चक्क पंतप्रधान कार्यालयाच्या कॅन्टींन मध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यावर या सर्वांना सुखद धक्का बसला.. तिथे सुशोभित टेबलावर शाही भोजनाची तयारी दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष भोजन आयोजित केले असून आपल्याला देण्यात आलेला निरोप म्हणजे स्नेहभोजनाचे विशेष निमंत्रण होते; याचा उलगडा होऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. खुद्द पंतप्रधान यांनी अशा तऱ्हेने आश्चर्यचकित करून सोडल्यामुळे अन्य खासदार देखील अचंबीत आणि आनंदित होणे स्वाभाविक होते..

दिलखुलास अ राजकीय गप्पा

क्षणातच गंभीर वातावरण पालटून गेले आणि उल्हासित आनंदी गप्पाटपांमध्ये रूपांतरित झाले.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलखुलास पणे अ राजकीय गप्पा केल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास निमंत्रित केलेल्या दोन महिला खासदारांपैकी डॉ. हिना गावित या महाराष्ट्रातील एकमेव महिला खासदार होत्या. नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित या अधिवेशनानिमित्त सध्या दिल्लीत असून संसदेत केलेल्या विशेष भाषणामुळे सलग तिसऱ्यांदा त्यांनी देशाचे लक्ष वेधले आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने देखील सध्या दिल्लीच्या वर्तुळात खासदार डॉ. हिना गावित यांचा बोलवाला आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील डॉ. हिना गावित यांच्या प्रगती पुस्तकावर विशेष लक्ष असल्याचे या प्रसंगातून नमूद झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नेहभोजनाला निमंत्रित केलेल्या या खासदारांसह वैयक्तिक डॉ. हिना गावित यांच्याशी सुद्धा लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांविषयी चर्चा केली माहिती घेतली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT