Navapur Retired Bank Manager Fraud
नंदुरबार : म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास पाच ते दहा पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सेवानिवृत्त वयोवृद्ध दांपत्याच्या बँक खात्यातील तब्बल 1 कोटी 39 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आयुष्यभर शेती, घर आणि सेवानिवृत्तीच्या स्वरूपात जमवलेली बचत लुबाडल्याने हे वृद्ध दांपत्य मानसिक धक्क्यात आहे.
या प्रकरणी भारतीय स्टेट बँकेचा सेवानिवृत्त व्यवस्थापक असलेल्या व्यक्तीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुळाबेन दिनेशचंद्र राणा (वय 79, रा. मंगलदास पार्क, नवापूर) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचे पती स्व. दिनेशचंद्र गुलाबदास राणा यांच्या नावाने नवापूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत संयुक्त ज्येष्ठ नागरिक बचत खाते होते. या खात्यात दोघांचे सेवानिवृत्तीचे पैसे, दरमहा मिळणारे वेतन तसेच वडिलोपार्जित शेती विक्रीतून मिळालेली रक्कम जमा होती.
फेब्रुवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात हे दांपत्य बँकेत आले असता, त्या वेळी भारतीय स्टेट बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत व सध्या सेवानिवृत्त असलेले मधुकर नारायण पाटील (रा. जनता पार्क, नवापूर) यांनी स्वतः म्युच्युअल फंड गुंतवणूक एजंट असल्याचे सांगितले. बचत खात्यापेक्षा म्युच्युअल फंडात पाच ते दहा पट अधिक व्याज मिळेल, तसेच भविष्यातील आजारपणासाठी ही गुंतवणूक उपयुक्त ठरेल, असे सांगून त्यांनी दांपत्याचा विश्वास संपादन केला. त्यासाठी केवळ सही केलेले कोरे चेकबुक देण्याची मागणी करण्यात आली. विश्वास ठेवून राणा दांपत्याने त्यांना सही केलेले चेक दिले.
मात्र, दांपत्य वयोवृद्ध असून त्यांना अपत्य नसल्याचा फायदा घेत आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेळोवेळी चेकवर मोठ्या रकमा भरून खोटे चेक सादर केले. यामाध्यमातून खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आले. खातेधारक दिनेशचंद्र राणा यांचे 7 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाल्यानंतरही, सन 2025 पर्यंत मधुकर पाटील यांनी स्वतःच्या नावाने तसेच सुनंदा मधुकर पाटील आणि सुरेश रमेश पाटील यांच्या नावावर एक, दोन, पाच व नऊ लाख रुपयांचे अनेक व्यवहार चेकद्वारे करून रक्कम वळती केली.
या प्रकारातून एकूण 1 कोटी 39 लाख 15 हजार रुपये परस्पर काढून विश्वासघात व फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मधुकर नारायण पाटील, सुनंदा मधुकर पाटील आणि सुरेश रमेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.