Nandurbar political crime: राजकीय विरोध हिंसक वळणावर; माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दरोडा

वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन गुन्हे दाखल झाले असून संशयीतांची धरपकड सुरू झाली आहे.
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

नंदुरबार: नगरपालिका निवडणूक शांततेत पार पडली असली तरी उपनगराध्यक्ष निवडीनंतर मागील दोन दिवसात घडलेला घटनांमुळे राजकीय संघर्षाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. यामुळे नंदुरबार मधील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दरोडा टाकणे, वाहन पेटवणे, सशस्त्र हल्ला करणे तसेच महिलांचा विनयभंग करणे या संदर्भाने वेगवेगळे तीन गुन्हे दाखल झाले असून संशयीतांची धरपकड सुरू झाली आहे.

नंदुरबार नगरपालिका निवडणूक दरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांनी शिवसेनेकडून उमेदवारी केली आणि विजय प्राप्त केला. नंतर दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी उपनगराध्यक्ष पदावर त्यांची निवड झाली. या निवडीनंतर जळका बाजार परिसरात मिरवणूक चालू असताना काही जणांकडून दगडफेक करण्याचा प्रकार घडला. यावरून चौधरी आणि त्यांचे विरोधक यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. तथापि रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसून दोन्ही गटांना समजविण्यात पोलिसांना यश आल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शांतता प्रस्थापित झालेली असतानाच मात्र रात्री 11 वाजे दरम्यान पुन्हा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. याचे पडसाद काल दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पुन्हा उमटले. दरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या घटनांविषयी तीन गुन्हे दाखल झाले असून त्या संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपअधीक्षक संजय महाजन, पोलिस निरीक्षक निलेश देसले यांनी भेट दिली. रात्री घडलेल्या घटनेनंतर शिरीष चौधरी यांच्या चौधरी गल्लीतील घराबाहेर एक अधिकारी, चार कॉन्स्टेबल, एक एसआरपी प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणूक दरम्यान झोंबा झोंबी करताना आढळले या कारणावरून हवालदार शैलेंद्रसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आल्याप्रकरणी दाखल दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, 40 ते 50 लोकांनी शिरीष हिरालाल चौधरी यांच्या राहत्या घरात, अंगणात तसेच सागर कन्हैय्यालाल चौधरी यांच्या घराच्या अंगणात लाठ्या, गावठी पिस्तुल, काठ्या, दांडके, तलवारी, गुप्ती, कोयते, लोखंडी दाड्यांला सायकलीच्या चैनची लोखंडी चकती बसवुन तयार केलेले हत्यार, पेट्रोलबॉम्ब, दगड, वीटा, काचेच्या बाटल्या आदी हत्यारासह हल्ला केला. तसेच घरात प्रवेश करून शिरीष चौधरी यांच्या आईचे रोजच्या वापराचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे स्त्रीधन पलंगावरुन उचलुन पळवुन नेले.

घराच्या आतील व बाहेरील बाजुस तोडफोड करून नासधूस केली. तसेच चौधरी यांची वापरती चारचाकी टोयोटा कंपनीची पांढऱ्या रंगाची इनोव्हा वाहन (क्रमांक एम.एच.39 ए.जे.8383) हिच्यावर पेट्रोलबॉम्ब टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सपोनि विश्वास भान्सी करीत आहेत. उपनगराध्यक्षांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा तिसरा गुन्हा जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल झाला आहे. नंदुरबार शहरातील सातपीर गल्लीत पतीसोबत दुचाकीने जाणाऱ्या महिलेस थांबवून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी आ.शिरीष चौधरी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्यासह ९ जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news