

नंदुरबार : संक्रांतीच्या उत्साहात पतंगबाजीचा आनंद लुटला जात असताना, दुसरीकडे याच पतंगाच्या मांजा दो-याने निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नंदुरबार शहरातील उड्डाणपुलावर गुरुवारी (१५ जानेवारी) सकाळी एका दुचाकीस्वाराचा गळा मांजामुळे गंभीररीत्या चिरला गेल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम सुदाम पटेल (वय ५५, रा. समशेरपूर, ता. नंदुरबार) हे आपल्या शेतीच्या कामासाठी दुचाकीने नंदुरबार शहराकडे येत होते. उड्डाणपुलावरून जात असताना अचानक लोंबकळणारा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. दुचाकीचा वेग असल्याने मांजा गळ्यात रुतला आणि त्यांचा गळा खोलवर चिरला गेला.
गळ्याला झालेल्या जखमेतून प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून परिसरातील एका रिक्षाचालकाने आणि काही जागरूक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. त्यांना तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने पटेल यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
नंदुरबार पोलिसांनी नायलॉन मांजाविरुद्ध कठोर मोहीम राबवून मोठी जप्ती केली असली, तरी शहरात छुप्या पद्धतीने या जीवघेण्या मांजाची विक्री सुरू असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी अशाच एका घटनेत एका किशोरवयीन मुलाचा बळी गेला होता, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला होता.
या घटनेची सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद झालेली नव्हती. मांजा अडकून जखमी होण्याचे अनेक प्रकार घडत आहेत, पोलीसांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.