Nandurbar Protest canva
नंदुरबार

Nandurbar Protest: नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण; कारण काय?

Nandurbar Jaikumar Valvi Death Case: नंदुरबार येथील जयकुमार वळवी या आदिवासी युवकाची दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी हत्या करण्यात आली होती.

Anirudha Sankpal

Nandurbar Violent Protest :

नंदुरबार - येथील जयकुमार वळवी या आदिवासी युवकाच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, या मागणीसाठी नंदुरबार शहरातून आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेल्या निषेध महामोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. दगडफेक करीत पोलीस वाहनांची तोडफोड आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील वाहनांची जाळपोळ सुरू झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. तथापि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब लाठीमार सुरू करून आणि धरपकड करून जमाव नियंत्रित केला. आता सर्वत्र शांतता असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

नंदुरबार येथील जयकुमार वळवी या आदिवासी युवकाची दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सूर्यकांत उर्फ भैय्या मराठे नामक कार्यकर्त्याने चाकू भोसकून हत्या केली. तेव्हापासून नंदुरबार जिल्ह्यातील वातावरण तणावग्रस्त आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा भरातील विविध आदिवासी संघटना आणि विविध पक्षातील आदिवासी समर्थकांनी एकत्र येऊन विशाल निषेध मोर्चा आयोजित केला होता.

बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी समाजातील आरक्षण देऊ नये या मागणीवरून रोज आंदोलन चालू असतानाच हा घटनाक्रम घडल्यामुळे जिल्हा घरातील वातावरण अधिकच चिघळलेले आहे. अशातच आज विविध संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चामध्ये जिल्हाभरातील संतप्त युवक युवती महिला आणि पुरुष सहभागी झाल्यामुळे या मोर्चाने अनपेक्षितपणे विक्राळ रूप धारण केले. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भिडेल एवढ्या मोठ्या रस्ते व्यापणाऱ्या रांगा लागल्या. निषेधाचे फलक आणि आक्रमक घोषणा यामुळे संपूर्ण शहर दणाणले होते. दरम्यान या तणावामुळेच कर्फ्यू लागल्याप्रमाणे शहराच्या कान्या कोपऱ्यात कडकडीत बंद पाळताना दिसून आले.

निवेदन दिल्यानंतर दगडफेक

जिल्हाधिकारी कार्यालयात हजारोच्या संख्येने मोर्चेकरी पोहोचले तोपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. याप्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यापर्यंत सर्व व्यवस्थित पार पडले. मात्र दुपारी अडीच वाजे दरम्यान मोर्चातून परतणाऱ्या काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अचानक दगडफेक सुरू केली. पोलिसांच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या वाहनांना लक्ष बनवण्यात आले. याप्रसंगी तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात आली.

एक दुचाकी जळून खाक झाली तर अन्य तीन वाहनांचे अग्नी उपद्रवाने मोठे नुकसान झाले. इतर दुचाकी व चारचाकी वाहनांचे देखील तोडफोडीमुळे नुकसान झाले. अनियंत्रित झालेल्या टोळक्याने जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच तोडफोड आणि जाळपोळ चालवलेली लक्षात घेऊन उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब लाठीमार सुरू करून आणि धरपकड करून जमाव नियंत्रित केला. सायंकाळी गुन्ह नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या सर्व स्थितीवर जिल्हा पोलीस अधीक्षक एस श्रवणदत्त, अप्पर पोलीस अधीक्षक अशीच कांबळे, उपअधीक्षक संजय महाजन, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह सर्व अधिकारी नजर ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT