Nandurbar crime news: पोलीस असल्याचे भासवत वाहनधारकांना अडवून खंडणी गोळा करणाऱ्या तीन तोतयांना धुळे-सुरत महामार्गावरील बेडकी चेक नाक्या जवळ अटक करण्यात आली. नवापूर तालुक्यातील बेडकी चेक नाका आरटीओ विभागाच्या वतीने वसुली करणाऱ्या पंटर लोकांमुळे आधीच बदनाम असताना ही घटना घडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
धुळे सुरत महामार्गावर वेगवेगळ्या राज्यातील मालवाहतूक करणारी आणि प्रवासी वाहतूक करणारी शेकडो वाहने दर मिनिटाला धावत असतात. त्या वाहनधारकांना नवापूर तालुक्यात विसरवाडी जवळ आणि गुजरात सिमेनजीकच्या बेडकी चेक नाक्याजवळ अडवले जाते आणि बेकायदेशीर रक्कम वसूल केली जाते. हे वर्षानुवर्ष चालत आले आहे. वाहनधारक संघटनांनी मंत्रालयापर्यंत धाव घेऊन सुद्धा कधीही त्याचा बंदोबस्त झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यात 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी झालेली कारवाई लक्ष वेधणारी ठरली.
त्याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापुर तालुक्यातील आरटीओ विभागाच्या बेडकी चेक नाका पासून काही अंतरावर तोतया पोलीस रक्कम वसूल करत असल्याची खबर प्राप्त झाली होती. त्यानुसार तपासणी केली असता, नवापुर तालुक्या तील बेडकी नाका आर.टी. ओ. चेक पोष्टचे अलीकडे हॉटेल देवनारायणच्या जवळ रोडवर तीन जण इंग्रजी भाषेत POLICE असे लिहिलेली कार उभी करून आपण पोलीस असल्याचे भासवत आहेत आणि वाहनांची अडवून तपासणी करत आहेत असे आढळून आले. म्हणून लगेचच त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.
त्यावेळी 5 लाख रुपये किंमतीची पोलीस असे लिहिलेली मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. पोलीस असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करण्यासाठी ते वापरत असलेल्या या कारला बनावट नंबर प्लेट लावत असल्याचे देखील तपासात उघड झाले.
कारचा क्रमांक एम. एच. १२ २. पी. एन. ७७०८, तिचा चेसिस नंबर एम. अ. ३ सी. झेड. एफ. बी. ३ एस. पी. एच. ८२०५९१ आणि इंजिन क्रमांक के. १२ एन. पी. ७३२४२५७ असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र क्रमांक एम. पी. ०९ झेड. डब्ल्यु. ३६९४ ही खरी नंबर प्लेट त्यांनी काढून ठेवली होती.
याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नायक बाजीराव विनोद पराडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस असल्याची बतावणी करुन तोतयागिरी करुन बेकायदेशीरपणे वाहने तपासणी केल्याच्या आरोपाखाली खुमानसिंग रघुवीरसिंग कुसवा वय ४२ वर्षे, राहणारफुटीकुटी इंदौर, मध्यप्रदेश, कमल तेजराम चौहान वय ३३ वर्ष, राहणार चांदेल, ता. देपालपुर, जि. इंदौर, राज्य मध्यप्रदेश आणि प्रताप सरदार सिसोदीया वय ३४ वर्षे, राहणार जव्हार टेकडी, इंदौर, राज्य मध्यप्रदेश या तिघां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक केशव मिठ्या गावीत हे करीत आहेत.