नंदुरबार : व्हिडिओ क्लिप्स बनवून अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तपासाला आणखी गती दिली जात आहे. जप्त केलेल्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डस् त्यासाठी खंगाळले जात आहेत. आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का? याचा शोध सुरू झाल्याने आता कोणते गौड बंगाल उघड होणार, याविषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या प्रकरणाचा संदर्भ असा की, अल्पवयीन मुलांना पैसे आणि तत्सम अमिष दाखवून एकांतात न्यायचे आणि त्यांचे लैंगिक शोषण करायचे, असा प्रकार चालू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांना प्राप्त झाली होती. तथापि त्याप्रकरणी कधीही कोणीही पोलिसांकडे तक्रार दिलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी स्वतः दखल घेऊन पुढील कारवाई करण्याचा निर्णय केला. त्यानुसार (दि.6 ऑगस्ट) मध्यरात्री पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सापळा रचला. तेव्हा शहराबाहेरील एका शेतात संबंधित तरुण रंगेहात पकडला गेला.
नंदुरबार शहरातील रायसिंगपुरा भागात राहणारा 22 वर्षीय चेतन प्रकाश कोळी असे या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दिनांक 12 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारा अत्यंत घृणास्पद व संतापजनक असा हा प्रकार नंदुरबार पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे उघडकीस आला, याबद्दल जिल्ह्यातील सर्व मान्यवरांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधिक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, हेकॉ. जगदीश पाटील, पोकॉ. रुपेश पगारे आदींनी केली.
अत्याचाराच्या क्लिप्सची संख्या किती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात संशयित तरुण हा सन २०२२ पासून अल्पवयीन बालके व समवयस्कर युवकांना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याचे निष्पत्र झाले आहे. असे असताना गेल्या चार वर्षात कोणत्याही पालकाने अथवा मुलांनी तक्रार का केली नाही? याबद्दल पोलिसांनाच प्रश्न पडला आहे. पिडितांवर दडपण आणण्यात कोणा प्रभावी व्यक्तीचा हात असावा का? हा सध्या लोकांच्या उत्सुकतेचा भाग बनला आहे. पकडण्यात आलेल्या तरुणाच्या मोबाईल मधून अनेक आक्षेपार्य व्हिडिओ क्लिप्स जप्त झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अत्याचार करतानाच्या क्लिप्स शेकडोच्या संख्येने असल्याची माहिती चर्चेत असली तरी क्लिप्स 300 आहेत की 600 यावर मात्र पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, सदरचे व्हिडीओ व छायाचित्रांचा डिजिटल पुरावा फॉरेन्सिक पथकाने संपूर्ण वैज्ञानिक पध्दतीने जतन केला असून मोबाईल मधील कॉल रेकॉर्ड सुद्धा तपासले जात असल्याचे समजते. या गैर कृत्याच्या हेतूने कोणी संपर्कात होते का? याचा तपास कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून केला जात आहे.
पीडीत मुलांची ओळख पटवणे सुरू
अधिक माहितीसाठी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता दैनिक 'पुढारी'शी बोलताना त्यांनी सांगितले की, अद्याप मोबाईल मधील डाटा आणि क्लिप्स तपासणे सुरू असून त्यांची खरी संख्या दोन दिवसांनी समोर येईल. अजून पिडीतांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. आतापर्यंत 70 हून अधिक क्लिप्स तपासून झाल्या आहेत. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करीत आहेत. त्याच्या घराची झडती घेतली असता कोणताही कॉम्प्युटर अथवा पेन ड्राईव्ह वगैरे काही आढळलेले नाही. त्याने संपूर्ण क्लिप्स मोबाईल मध्येच सांभाळून ठेवल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले. गैर कृत्य करताना त्यांनी शहराबाहेरील काही मोकळ्या जागा आणि शेत शिवार यांचा वापर केला, त्यामुळे कोणाला नजरेस पडले नसावे; असे एकंदरीत निष्पन्न झाले आहे; असेही पोलीस निरीक्षक संदीप पाटील म्हणाले.