नंदुरबार

Nandurbar forest fire | जंगलात पुन्हा वणवा पेटला; शेकडो झाडे खाक; वनविभागाच्या निष्क्रियतेवर संताप

वणवा पेटवणाऱ्यांचा शोध घेवून गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील काकडदा परिसरात जंगलाला काल मध्यरात्री भीषण आग लागून शेकडो सागवानची झाडे जळून खाक झाली. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सातपुडा पायथ्याशी वणवे पेटवण्याची ही पाचवी घटना आहे. वरच्यावर लागोपाठ असे घडत असताना मात्र वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचे आरोप स्थानिक आदिवासी करु लागले आहेत.

वनसंपदा धोक्यात येण्याबरोबरच वन्यजीवांच्या अस्तित्वाला सुद्धा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धडगाव तालुक्यातील काकडदा परिसरात असलेल्या जंगलाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागून भीषण वणवा पेटला. स्थानिक आदिवासींना हे लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी धावून आले परंतु वनविभागाला आग विझविण्यात अपयश आले. दरम्यान, वाऱ्यामुळे वणव्याने रौद्ररुप धारण करीत शेकडो वृक्ष जळून खाक झाली. आगीत शेकडो सागाच्या झाडांसह वनसंपदा नष्ट झाली; अशी स्थानिकांनी माहिती दिली आहे.

उपाय योजनांचा अभाव

गत पाच महिन्यापासून सातपुड्यातील वणव्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आगीमुळे वनसंपदा धोक्यात आली असून वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. या आगीने दुर्मिळ पक्षींसह वन्यजीव होरपळत्याची भिती व्यक्त केली जात आहे. परंतु आतापर्यंत घडलेल्या आगीच्या घटनांप्रकरणी सखोल तपास झाल्याचे समोर आलेले नाही तसेच गुन्हेगारांचा शोध घेऊन पकडल्याचे उदाहरण पाहायला मिळालेले नाही. याबद्दल पर्यावरण प्रेमी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वणवा नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. वणवा पेटवणाऱ्यांचा शोध घेवून गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT