Hasan Mushrif Nandurbar Visit Pudhari
नंदुरबार

Nandurbar Guardian Minister | पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हसन मुश्रीफ यांचा पहिल्यांदाच नंदुरबार दौरा

आरोग्य, शिक्षण व पाणी प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Hasan Mushrif Nandurbar Visit

नंदुरबार : पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (१७ एप्रिल २०२६) विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संगवी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधांची मजबुती आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. आरोग्य क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा, ग्रामीण भागात वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असावे, असे त्यांनी नमूद केले.

शिक्षण क्षेत्रात शाळांमधील पायाभूत सुविधा, डिजिटल साधनसामग्री आणि शिक्षकांची उपस्थिती याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

पाणीटंचाई हा जिल्ह्यातील गंभीर प्रश्न असल्याचे नमूद करत त्यांनी जलसंधारण प्रकल्प, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि टँकर व्यवस्थापनात पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश दिले. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळापत्रक निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.

यावेळी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी करणे आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याबाबतही चर्चा झाली. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करत जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा योजना, पोलीस, कृषी, आरोग्य, आदिवासी विकास, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत अभियान, आपत्ती व्यवस्थापन, नगर विकास आणि वन विभाग आदी विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT