Fake Documents Pudhari
नंदुरबार

Nandurbar Crime | बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश; नंदुरबारमध्ये वकिलासह पाच जण अटकेत

जिल्हा पोलीस अधीक्षक एस. श्रवणदत्त यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली

पुढारी वृत्तसेवा

Fake Birth and Death Certificate Racket Nandurbar

नंदुरबार : नंदुरबार शहरात बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा नंदुरबार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील एका सायबर कॅफेवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी एका वकिलासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदुरबार शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक एस. श्रवणदत्त यांनी आज (दि. 2) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नंदुरबार नगरपरिषदेमधील काही कर्मचारी आणि खासगी व्यक्तींनी संगनमताने बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करून जन्म-मृत्यू नोंदी व प्रमाणपत्रांमध्ये बनावट नोंदी केल्या. हा गैरप्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. यामधून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासन व नागरिकांची फसवणूक करून हजारो रुपयांची बेकायदेशीर वसुली करण्यात येत होती.

दि. 29 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गोपनीय माहिती मिळाली होती. शास्त्री मार्केट परिसरातील आर. के. ऑनलाईन सायबर कॅफेमध्ये बनावट शासकीय शिक्क्यांच्या आधारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याची माहिती होती. त्या अनुषंगाने पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकून तपासणी केली. या कारवाईत बनावट शासकीय शिक्के, बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर, संगणक तसेच मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 124/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 61(2), 318(4), 336(2) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत अनिल यशवंत कोळी (नगरपरिषद ऑपरेटर), रिजवान खान सुभान खान (आर. के. सायबर कॅफे चालक), इमरान याकूब पिंजारी (वकील), लाला ऊर्फ मोहम्मद अली मोहम्मद युसूफ पटेल (नगरपरिषद शिपाई) आणि शेख शफिक शेख इसाक कुरेशी (सायबर कॅफे कर्मचारी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बनावट जन्म-मृत्यू नोंदी, शासकीय शिक्के व दस्तऐवजांचा वापर करून आर्थिक लाभ घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात नगरपरिषदेपासून सायबर कॅफेपर्यंत साखळी कार्यरत असल्याचे उघड झाले असून हा गैरप्रकार 1 जून 2022 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. श्रवणदत्त यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय प्रमाणपत्रासाठी केवळ अधिकृत कार्यालये व शासनमान्य केंद्रांशीच संपर्क साधावा. तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे व गुन्हे शोध पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT