

नंदुरबार - सुमारे 65 हजाराची लाच स्वीकारताना नंदुरबार येथील मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात याकडे या निमित्ताने लक्ष वेधले गेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त यांच्या कार्यालयात दि.30 जुलै 2025 रोजी जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीची सभा घेण्यात आली. या सभेत रंगावली तलाव, उंबर्डी, ता. नवापूर येथे दि.1 जुलै 2025 ते 30 जून 2030 या कालावधीसाठीचा सामंजस्य करार तक्रारदार यांच्यासोबत करण्यासाठी चेअरमन, नवजीवन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादीत, खैरवे, ता. नवापूर यांना मान्यता दिली होती. परंतु मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी किरण गणेश पाडवी (५४) याने तक्रारदाराला सदर मान्यता आदेशाची प्रत देवून मत्स्यव्यवसाय ठेका मंजूर केल्याच्या मोबदल्यात बक्षिस म्हणून १ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराकडे एवढी रक्कम नसल्याने त्यांनी त्या कालावधीत पैसे दिले नव्हते.
मात्र काही महिने लोटल्यानंतर म्हणजे दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी किरण पाडवी याने तक्रारदार यांना त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि तलावात मासे न टाकल्याचे कारण सांगून तक्रारदार यांचा ठेका रद्द करण्याची व अन्य इसमास देण्याची भिती दाखवली. ठेका रद्द न करण्यासाठी तक्रारदाराकडे २ लाख ६५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यांनतर आज दि. २३ जानेवारी २०२६ रोजी त्यातील २ लाख रुपये अन्य इसमाचे बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगून ६५ हजार रु. लाच रक्कम किरण पाडवी याने त्यांचे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, नंदुरबार येथील कार्यालयात स्विकारली. सदर कारवाई पोउपअधीक्षक प्रशांत भरते, पो.नि.विकास लोंढे, सहा पोउपनि विलास पाटील, पोहवा, देवराम गावीत, पोहवा विजय ठाकरे, पोहवा हेमंतकुमार महाले, पोहवा नरेंद्र पाटील, पोहवा जितेंद्र महाले, पोहवा संदीप खंडारे, पोना सुभाष पावरा (सर्व नेमणूक ला.प्र.वि. नंदुरबार) यांच्या पथकाने केली.