

नंदुरबार : लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीला लगाम घालण्यासाठी नंदुरबार पोलीस दलाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह शहादा परिसरात केलेल्या कारवाईत सुमारे ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, याप्रकरणी नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर 'सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न' केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस दलाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात पतंगोत्सवाचा मोठा उत्साह असतो. मात्र, याच उत्साहाचा फायदा घेत काही विक्रेते बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा काळाबाजार करतात. गेल्या वर्षी याच मांजामुळे एका निष्पाप बालकाचा बळी गेला होता, ज्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा पोलीस प्रशासनाने संक्रांतीच्या महिनाभर आधीच कडक पावले उचलली आहेत.
नंदुरबार शहरातील बाहेरपुरा भागात एका मालवाहू टेम्पोमध्ये (MH 47 A 1252) नायलॉन मांजा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार डीबी पथकाने सापळा रचून टेम्पोची तपासणी केली असता, त्यात नायलॉन मांजाचे ६० प्लास्टिक रिल्स सापडले. पोलिसांनी ५ लाख ५० हजारांचा टेम्पो आणि १ लाख २० हजारांचा मांजा, असा ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालक अर्जुन अहिरे आणि कल्पेश अहिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे, शहादा येथील जुन्या भाजी मंडईजवळही पोलिसांनी छापा टाकला. येथे १ लाख २० हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा एका बॉक्समध्ये दडवून ठेवलेला आढळला. याप्रकरणी गणेश बापू वाडिले आणि कल्पेश उमेश जावरे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, उपनिरीक्षक छगन चव्हाण, भुवनेश मराठे व डीबी पथकाने यशस्वी केली.
जिल्ह्यात इतरही ठिकाणी तपासणी सत्र सुरू असून, नायलॉन मांजा बाळगणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळून पक्षी आणि मानवी जीविताचे रक्षण करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.