Fraud Case Pudhari
नंदुरबार

Nandurbar Bank Fraud | नंदुरबारमध्ये बँक खात्यातून लाखोंची अफरातफर; व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा

एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेतील धक्कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar Illegal Transaction Case

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे बँक खात्यांमधून सुमारे ५० लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

मोहीदे (ता. शहादा) येथील कमलताई हौसिंग सोसायटीत राहणारे ७७ वर्षीय प्रल्हाद नरोत्तम पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाटील हे सेवानिवृत्त प्राचार्य असून सध्या शेती व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत, एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेतील व्यवस्थापक अमित अनिल पालोदकर यांनी विश्वास संपादन करून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यांमधून रक्कम काढल्याचा आरोप केला आहे.

फिर्यादीनुसार, २०२४ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ३८ लाख २० हजार २४८ रुपये काढण्यात आले. याचप्रमाणे शहादा येथील सखाराम दुल्लभ पाटील यांच्या खात्यातूनही सुमारे ११ लाख ३० हजार रुपये विनासंमती काढण्यात आल्याचे समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकारात अमित पालोदकर यांनी अनिकेत महाजन व आदर्श भालेराव यांच्यासोबत संगनमत केल्याचा आरोप असून, पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईलवरील व्यवहारांचे संदेशही हटवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी अमित अनिल पालोदकर (रा. पालोद, ता. जि. संभाजीनगर), अनिकेत सुनील महाजन आणि आदर्श विलास भालेराव यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT