Nandurbar Crime : पत्नीला नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाचा राडा; चक्क सासरचं घरच पेटवलं

दोन कुटुंबांचा अन्नधान्याचा साठा, संसार काही क्षणांत खाक
Image By AI
Image By AI
Published on
Updated on

नंदुरबार : ‘माझ्या पत्नीला नांदायला पाठवत का नाही?’ या रागातून एका माथेफिरू जावयाने टोकाचे पाऊल उचलले. पत्नीला परत पाठवण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पतीने चक्क आपल्या सासरकडच्या नातलगाचे घरच पेटवून दिले. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारचे घरही कचाट्यात आले आणि दोन्ही कुटुंबांचा अन्नधान्याचा साठा व सर्व संसार काही क्षणांत खाक झाला. धडगाव तालुक्यातील खडक्याचा पाटील पाडा परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

या याबबात अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील खडक्याचा पाटील पाडा येथील रहिवासी मिथुन भाईदाम पाडवी आणि लिलाबाई डुमडा पाडवी (वय ४५, रा. कुंडलचा मोहुचा पाडा) यांच्यात पत्नीला नांदायला पाठवण्याच्या कारणावरून वाद झाला होता. ‘जर माझ्या पत्नीला नांदायला पाठवले नाही, तर तुझे घर जाळून टाकेन,’ अशी धमकी मिथुनने लिलाबाईंना दिली होती. त्यानंतर १६ एप्रिलच्या रात्री मिथुनने ही धमकी प्रत्यक्षात आणली.

रात्रीच्या वेळी त्याने घराला आग लावली. या भीषण आगीत डुमडा भायजा पाडवी यांचे घर जळून त्यातील अन्नधान्य व संसाराची राख झाली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, शेजारी राहणारे सुभाष वळवी यांचे घरही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याप्रकरणी लिलाबाई पाडवी यांनी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मिथुन पाडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लाखो रुपयांचे नुकसान

फिर्यादीनुसार, डुमडा पाडवी यांच्या घरातील ६० हजार रुपयांचे साहित्य जळाले आहे. यात १५ क्विंटल ज्वारी (किंमत १५,००० रु.), ५० किलो तूर (२,००० रु.), अन्नधान्य (१०,००० रु.), एक मौल्यवान लाकडी ढोल (५,००० रु.) आणि २८ हजार रुपये किमतीचे घराचे लाकडी साहित्य व कौलांचा समावेश आहे.

तसेच, शेजारील सुभाष वळवी यांचेही अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील ९ क्विंटल तांदूळ (२५,००० रु.), २ क्विंटल ज्वारी (२,००० रु.), सेंट्रिंगचे सामान (३,००० रु.) आणि १५ हजार रुपये किमतीचे राहते घर व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. दोन्ही घरांचे मिळून एकूण १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news