नंदुरबार - जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये यासाठी आम्ही कायमच दक्षता घेतली आणि विक्रमी संख्येत घरकुलांना मान्यता मिळवून मोठ्या प्रमाणात बेघरांना न्याय दिला आणि आता जागे झालेले काही आमदार घरकुल लाभार्थ्यांचे कैवारी बनून बैठकांचा फार्स करीत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या घरकुल योजनांवर मागील काही वर्षांपासून आमचे काम चालू असताना आणि जनतेला न्याय देणे चालू असताना जिल्ह्यातील हे अन्य आमदार कुठे होते? असा प्रश्न करीत माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
घरकुल योजनेतून आतापर्यंत दिलेल्या लाभाची माहिती देण्यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज 22 जून 2025 रोजी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, तळोदा येथील माजी सैनिक रूपसिंग पाडवी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य उपस्थित होते.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नंदुरबार येथील विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक आणि भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी अचानक घरकुल लाभार्थी अडचणीत असल्याचा मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बैठक आयोजित करायला सांगितली. ही बैठक उद्या सोमवार दिनांक 23 जून रोजी या चारही आमदारांच्या उपस्थितीत होणार असून घरकुलचा मुद्दा अचानक राजकीय ऐरणीवर आला आहे.
याप्रसंगी डॉ. विजयकुमार गावित यांनी घरकुल योजनांची विस्तृत माहिती देताना सांगितले की, माझ्या मंत्री पदाच्या काळात तसेच डॉ. हिनाताई गावित यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये याची विशेष दक्षता घेतली. पंतप्रधान आवास योजना असेल, शबरी घरकुल योजना असो, रमाई घरकुल योजना असो किंवा ओबीसींची मोदी आवास योजना असो या विविध योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळवून दिला. त्यांनी पुढे सांगितले की, 2016 ते 2025 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 2 लाख 57 हजार 876 घरकुल मान्यता देण्यात आली. त्यातील एक लाख 14 हजार 9997 पूर्ण झाले आहेत.
घरकुलांच्या कामाला वेग मिळावा यासाठी मागच्या दोन वर्षात नंदुरबार प्रकल्प कार्यालयाला 17. 5 कोटी रुपये तर तळोदा प्रकल्प कार्यालयाला तळोदा प्रकल्प कार्यालयाला 17 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती देताना आज डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नगरपालिका क्षेत्रातील घरकुलांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले प्रत्येक शहरातील बेघरांना सुद्धा घरकुल मिळावे या प्रयत्नातून प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात सुद्धा घरकुल मंजूर करण्यात आले परंतु प्रत्येक नगरपालिकेने त्यांच्याकडे आलेल्या बेघरांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून ते प्रलंबित ठेवले आहेत.
गायकवाड समितीची चौकशी चुकवण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला; हे सांगणे तद्दन चुकीचे आहे. मी भाजपात प्रवेश केला तेव्हा सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो आणि भाजपा हा तेव्हा सत्ताधारी पक्ष नव्हता. ती चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या आमदार खासदाराने पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे पूर्ण माहिती ठेवली पाहिजे; असाही टोला डॉक्टर गावित यांनी लगावला. दरम्यान, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी जिल्ह्यातील प्रत्येक बेघराला घरकुल देण्यासाठी आपण बांधील असून प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले तसेच कोणत्याही लाभार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले.