

नाशिक : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या नंदुरबार कार्यक्षेत्रातील नवापूर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यांतील पात्र अनुसूचित जमातीच्या लाभार्थींकडून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत मंजूर आराखड्यातील योजनांसाठी https://www.nbtribal.in या पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले आहेत.
उत्पन्ननिर्मितीच्या किंवा उत्पन्नवाढीच्या योजना, मानव साधनसंपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना असून, त्यात ८५ टक्के अनुदान मिळणार असून, लाभार्थी हिस्सा १५ टक्के राहणार आहे. यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी टोकेनयंत्र घेण्यासाठी अर्थसहाय्य, अनुसूचित जमाती तसेच आदिम जमातीच्या लाथार्थींना १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य, शेती मशागत व खते, बियाणे आदी साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य, अनुसूचित जमातीच्या महिलांना शिलाई व पिकोफॉल मशीन, टेबल खरेदीसाठी अर्थसहाय्य, पेसा क्षेत्रातील आदिवासी ग्रामपंचायतींना सावर्जनिक कार्यक्रमांसाठी भांडी खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचप्रमाणे आदिवासी कलापथकांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कला साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभार्थींनी जातीचा दाखला यासह आवश्यक कागदपत्रांसह दि. २ जून ते १५ जुलैदरम्यान आनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन नंदुरबार प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी केले