

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सलग १५ ते २० वर्षे एकाच टेबलावर तळ ठोकून बसले होते. बदल्यांचे आदेश, बिल मंजुरी यांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या याच कर्मचाऱ्यांविरोधात आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले होते. अखेर जिल्हा परिषद सीईओ सावनकुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून निर्णायक पाऊल उचलले असून, आदिवासी संघटनांनी त्यांचे आभार मानले आहेत.
शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी एका शिक्षकाकडून तब्बल ९० हजार रुपयांची लाच घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिक्षक बाजीराव शिंदे (प्राथमिक शाळा, नानगीपाडा, ता. नवापूर) यांच्याकडून ही रक्कम एनओसीसाठी घेतल्याचे समोर आले होते. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती. १३ वर्षांपासून शिक्षण विभागात एकाच पदावर कार्यरत असलेले मारनर यांची अखेर पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे.
सुनील नथा पाटील हा शिक्षक देखील १२ वर्षांपासून पाणीपुरवठा विभागात एकाच टेबलावर कार्यरत होता. त्याचाही समावेश बदल्यांमध्ये करण्यात आला आहे.
प्रत्येक ३ वर्षांनी कर्मचाऱ्यांची बदली करावी लागते, असा स्पष्ट शासन निर्णय असतानाही काही अधिकारी-कर्मचारी १५ वर्षांहून अधिक काळ एकाच जागी होते. या संदर्भात अशा कर्मचाऱ्यांचे हितसंबंध तुमच्याशी आहेत का? असे आदिवासी संघटनांनी प्रश्न उपस्थित करत सीईओवरही थेट आरोप केले होते.
बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली २८ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढण्यात आला. पुढे २७ मे रोजी पुन्हा निवेदन देऊन तीव्र मागणी करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ३ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.
सावनकुमार यांनी अखेर पुढाऱ्यांच्या दबावाला न जुमानता कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने आदिवासी संघटनांनी त्यांचे आभार मानले. त्यामुळे ही कारवाई प्रशासकीय पारदर्शकतेचा विजय म्हणून पाहिली जात आहे.