उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे तपासात अव्वल : पी. आर. पाटील

अविनाश सुतार

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने सन २०२१ करीता राज्यातील सर्व पोलीस घटकांचे दोषसिध्दी प्रमाणाचे विश्लेषणात्मक परीक्षण केले. यामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस घटकात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण ९२.९३ टक्के इतके असल्याने महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दल अव्वल ठरले आहे. याबाबतचे पत्र कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (P. R. Patil) यांनी दिली.

गुन्हे दोषसिध्दीसाठी म्हणजे गुन्ह्यातील आरोपी दोषी सिद्ध होऊन शिक्षा होण्यापर्यंतचा परिणाम साधणारे काम करण्यासाठी नियोजनबध्द कामकाज करण्याची विशिष्ट पद्धत अवलंबण्यात आली आहे. यात पोलीस अधीक्षक (P. R. Patil) यांच्या सुचनेनुसार नंदुरबार पोलीस दलामार्फत ५ कलमी कोर्ट कमिटमेंट सारखे उपक्रम आणि विशेष उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाल्यापासून अतिगंभीर, गंभीर गुन्हयामधील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयात गुन्हे अपराधसिध्दी व गुन्हे प्रतिबंध व उघडकीस आणण्याकरिता नेहमीच विविध उपाययोजना राबविण्यात येतात. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलामार्फत तपास वेळेत व उत्कृष्ट करणे, समन्स वॉरंट बजावणी बाबत पोलीस ठाणे प्रभारी व संबंधित अंमलदार यांनी दैनंदिन आढावा घेणे, पोलीस अधिकारी, अंमलदार व सरकारी वकील यांनी साक्षी अगोदर एकमेकांशी संपर्क व समन्वय ठेवणे, पोलीस साक्षीदार व तपास अधिकारी यांची दररोज मुलाखत घेणे, उत्कृष्ट तपास व गुन्हे शाबितीकरीता प्रोत्साहनपर बक्षीस तसेच प्रमाणपत्र वाटप करणे, असे उपक्रम राबवले जात असतात.

नंदुरबार जिल्हयातील खटल्यांचे सन २०२९ मध्ये एकंदर शिक्षेचे प्रमाण ९२.९३ टक्के आहे. तपास अधिकारी यांनी केलेल्या गंभीर गुन्हयाचे तपासात न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात दोषसिध्दी झाल्यावर तपासी अधिकारी, कोर्ट पैरवी अधिकारी, मुख्य पैरवी अधिकारी यांना प्रोत्साहनपर रोख स्वरुपात रक्कम बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच निवृत्त पोलीस तपासी अधिकारी, अंमलदार यांना त्यांनी केलेल्या गुन्हे तपासात दोषसिध्दी झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात येतो. पोलीस दल व सरकारी वकील, अभियोक्ता यांच्यात झालेल्या समन्वयामुळे नंदुरबार जिल्हयात दोषसिध्दीचे प्रमाण वाढण्यास मदत झालेली आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

SCROLL FOR NEXT