नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिकेच्या 40 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. ६) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. एनएमसी सुपरकिंग व एनएमसी वॉरियर्स या दोन संघांमध्ये अटीतटीचा सामना झाला. सुपरकिंगने वॉरियर्सचा अवघ्या दोन धावांनी पराभव करत विजय साकारला.
एनएमसी सुपरकिंगचे कर्णधार डॉ. आवेश पलोड यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जयवंत राऊत यांच्या तडाखेबंद 18 धावांच्या जोरावर सुपरकिंगने निर्धारित 10 षटकांत 5 बाद 80 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल रवींद्र बागूल कर्णधार असलेल्या एनएमसी वॉरियर्स संघाला 6 बाद 78 धावा करता आल्या. संदेश शिंदे यांची अष्टपैलू खेळी, तर नितीन गायकवाड यांचे तीन बळी हे सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, प्रभारी उपआयुक्त नितीन नेर, हर्षल बाविस्कर, सुनील आव्हाड, मदन हरिश्चंद्र, संदेश शिंदे, गणेश मैंद, रवींद्र बागूल, जयवंत राऊत, गिरीश निकम, हुसेन पठाण, अनिल गायकवाड, सागर पिठे, विशाल घागरे, मोहित जगताप, संकेत शिवणकर, प्रवीण ठाकरे, भास्कर बहिरम, सचिन बोरसे, दत्ता क्षीरसागर, राजाराम जाधव, विशाल खोडे, हुसेन शेख आदींनी सहभाग घेतला होता. नगर नियोजन विभागातील समीर रकटे यांनी सामन्याचे नियोजन केले होते.
आज सांस्कृतिक कार्यक्रम….
मनपा वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. ७) राजीव गांधी भवन येथे प्रशासन विभागात सकाळी सत्यनारायण पूजेचे आणि संध्याकाळी सात वाजता कालिदास कलामंदिरामध्ये सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार गाणे सादर करणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.