उपचाराअभावी सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू; पानशेत येथील घटना | पुढारी

उपचाराअभावी सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू; पानशेत येथील घटना

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पानशेत येथे जिल्हा परिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभी केली आहे. मात्र, या केंद्रात डॉक्टर, कर्मचारी नसल्याने रविवारी वेळेवर उपचार न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे या तरुणीचा बळी गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

मयूरी प्रकाश मोरे (वय 17, रा. पानशेत पाटबंधारे वसाहत) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असताना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही गोरगरिबांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नसल्याचे गंभीर चित्र या घटनेने पुढे आले आहे.

मयूरी ही पानशेत रस्त्यावरील खानापूर येथे अकरावीत शिकत होती. सुटी असल्याने ती रविवारी सकाळी पानशेत धरणाच्या सांडव्याखालील नर्सरीच्या रानात शेळ्यांना चारण्यासाठी गेली होती. दुपारी अडीच्या सुमारास झाडाझुडपांत गेलेल्या शेळ्या बाहेर काढण्यासाठी ती गेली असता तिला सापाने दंश केला. त्या वेळी तेथे कोणीही नव्हते. यामुळे घाबरलेली मयूरी एकटी पायी चालत पानशेत वसाहतीतील तिच्या घरी आली. त्यानंतर सर्पदंश झाल्याची माहिती तिने नातेवाइकांना दिली.

तिच्या नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी तिला तातडीने पानशेत येथील आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टर, कर्मचारी नसल्याने आरोग्य केंद्र बंद होते. त्यानंतर मयूरीवर उपचार करण्यासाठी तिच्या नातेवाइकांनी पानशेत येथील खासगी डॉक्टर डॉ. बी. डी. खामकर यांना घरी बोलविले. डॉ. खामकर यांनी तपासणी केली असता त्यांनी तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र, तिला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाईक तिला रिक्षातून घेऊन पुण्याकडे जाण्यासाठी निघाले.

वाटेत मयूरीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे खडकवासला येथील दवाखान्यात तिला नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मयूरीच्या मागे आई, वडील, दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. मजुरी व शेळीपालनावर मोरे कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे.

पानशेत आरोग्य केंद्र केवळ नावाला !
अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले पानशेत येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ नावापुरते उभे आहे. अद्यापही आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी नियुक्त करण्यात आले नाही. दोन कर्मचारी व एक हंगामी डॉक्टर कधीतरी या आरोग्य केंद्रात असतात. सुटीच्या दिवशी तसेच इतरही दिवशी आरोग्य केंद्र बंद असते. दुर्गम खेड्यातल्या धरणग्रस्तांसह परिसरातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

…म्हणे डॉक्टर काम करण्यास नाखूष!
याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती पुढे आली. पानशेत आरोग्य केंद्रात काम करण्यास डॉक्टर नाखूष आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सहा डॉक्टर नियुक्त करण्यात आले. मात्र, एकही हजर झाला नाही. त्यामुळे पानशेत आरोग्य केंद्र अद्यापही कार्यान्वित झाले नाही. केवळ आलिशान इमारत, सुसज्ज यंत्रणा उभी आहे.

आरोग्य केंद्राची आलिशान इमारत उभी आहे. मात्र, रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. रात्री कोणतेही उपचार मिळत नाही.

                                                         – सुनील गायकवाड, माजी सरपंच

पानशेत आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले आहे. वारंवार विनंत्या करूनही कर्मचारी नियुक्त केले जात नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी रुग्णांचे बळी जात आहेत.
                                                                  – अमोल नलावडे,
                                                           माजी जिल्हा परिषद सदस्य

Back to top button