उत्तर महाराष्ट्र

मालेगाव मनपा शिक्षण मंडळात डमी शिक्षक ; अधिकार्‍यांच्या शाळाभेटीत प्रकार उघडकीस

गणेश सोनवणे

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिका शिक्षण मंडळातील गैरप्रकार खुद्द स्थायी समिती सभापती, सभागृहनेते यांनी उघडकीस आणला असून, शनिवारी (दि. 12) त्यांनी केलेल्या शाळा पाहणीत मूळ शिक्षक बेपत्ता आणि त्यांनी पगारी नेमलेले डमी शिक्षक वर्ग चालविताना मिळून आलेत. विशेष म्हणजे, सर्व विद्यार्थी उपस्थित नसले, तरी हजेरीवहीत सर्वांची उपस्थिती लावण्यात आल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकरणाची नोंद उपआयुक्त राजू खैरनार यांनी घेतली असून, आता प्रशासन काय कारवाई करते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

मालेगाव मनपाला शासनाकडून दोन कोटी रुपयांचा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अग्निशमन बंब मिळाला. त्याची पाहणी केल्यानंतर सभागृहनेते असलम अन्सारी व स्थायी समितीचे सभापती जफर अहमद यांनी मनपा शाळा क्रमांक-47 ची पाहणी केली. मुख्याध्यापक कार्यालयीन कामात व्यग्र, तर तीन महिला शिक्षिका वर्ग चालवत होत्या. मात्र, मूळ नियुक्ती असलेले सोहेल मास्तर अनुपस्थित होते. एका शिक्षिकेने त्यांनीच आपल्याला पंधराशे रुपये मानधनावर नियुक्त केल्याचा धक्कादायक खुलासा केला. दुसर्‍या वर्गातही दोन हजार रुपये मानधनावर एक महिला वर्ग घेत असल्याचे उघड झाले. तिसर्‍या वर्गात पटावर 37 विद्यार्थी आणि उपस्थित केवळ नऊ. मात्र सर्व विद्यार्थ्यांची हजेरी लावण्यात आल्याचे दिसून आले.

शाळेत पथक आल्याची वार्ता पसरताच सोहेल मास्तर शाळेत दाखल झाले. तत्पूर्वीच उपआयुक्त खैरनार यांनी रजिस्टरला नोंद केलेली असल्याने संबंधित शिक्षकाची भंबेरी उडाली. परिसरातील प्रारंभी बंद असलेले वर्गही नंतर उघडले गेले. मात्र, एकही विद्यार्थी हजर नव्हता. कुणी परीक्षा देऊन विद्यार्थी घरी गेल्याचा बनाव केला. मात्र, उत्तरपत्रिका दाखवू शकले नाहीत. या प्रकाराने अधिकारी व पदाधिकारी अवाक् झाले. मनपा शिक्षण मंडळातील या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत सभागृहनेते अन्सारी यांनी, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असून, शासनाचीही फसवणूक होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सर्वच शाळांची तपासणी करून बोगस शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कारवाई शून्य
तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे यांनी मनपाच्या शाळांची एकाच वेळी तपासणी करून बोगस शिक्षक व विद्यार्थी शोधले होते. मात्र, नंतर कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. 50 हजारांहून अधिक वेतन घेणारे शिक्षक बेरोजगार युवक-युवतींना मासिक दोन-तीन हजार रुपये देऊन त्यांच्या जागेवर नियुक्त करतात, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT