उत्तर महाराष्ट्र

लासलगाव : कांदा दरातील घसरण थांबवण्याकरिता सुवर्णा जगताप यांचे पत्र

गणेश सोनवणे

नाशिक (लासलगाव) वार्ताहर -: कांदा भावातील घसरण थांबवण्यासाठी केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करावी अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांना पत्र पाठवून केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांदा आवकेत वाढ होऊन बाजारभाव कमी होत आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमधील स्थानिक कांदाही तेथील बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने व महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यात नविन उन्हाळ ( रब्बी ) कांद्याची आवक सुरू झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत असून मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

कांदा निर्यातदारांकरीता केंद्र शासनाने यापुर्वी लागु केलेली १० % कांदा निर्यात प्रोत्साहन योजना  दि . ११ जुन २०१९ बंद केलेली असल्याने सदरची योजना पुन्हा सुरू करणेसाठी प्रयत्न करण्यात यावा.  भारतीय निर्यातदारांना त्यांनी पाठविलेल्या मालाची रक्कम त्या – त्या देशातील चलनामध्ये अथवा डॉलरमध्ये मिळते.  मात्र येथील निर्यातदारांना सदर चलनातील रक्कम पुन्हा भारतीय चलनात परावर्तीत ( Exchange ) करून घ्यावी लागते . अशावेळी डॉलरचे भाव सतत बदलत असल्याने येथील निर्यातदारांना अनेक वेळा विनिमय दरामुळे तोट्यास सामोरे जावे लागते. त्यामुळे सार्क देशांमधील आर्थिक व्यवहार त्या त्या देशातील चलनामध्ये अथवा डॉलरमध्ये न होता भारतीय चलनात होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.

बांग्लादेशला रेल्वेद्वारे कांदा पाठविण्यासाठी असलेली कोटा सिस्टीम संपुष्टात आणून सदर निर्यातदारांना पाहिजे तेवढा माल पाहिजे तेव्हा बांग्लादेशला पाठविणेसाठी किसान रेल किंवा BCN च्या हाफ रॅकद्वारे पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावा. सध्या रेल्वेद्वारे कांदा पाठविणेसाठी BCN रॅक उपलब्ध करून दिल्या जातात. सदर रँकद्वारे कांदा वाहतुकीसाठी साधारणतः ०५ ते ०८ दिवसांचा कालावधी लागतो. त्याऐवजी येथील कांदा निर्यातदारांना किसान रेल अथवा त्या धर्तीवर व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र रेल उपलब्ध करून दिल्यास सदरचा माल ४८ ते ६० तासांमध्ये पोहोचविला जाईल. वेळ आणि भाडेदरातील बचतीमुळे व्यापारी वर्ग अधिकचा मोबदला शेतकरी बांधवांना भाववाढीसाठी देऊ शकतील. कांदा खरेदीदारांना- Transport Subsidy दिल्यास माल वाहतुक दरात अनुदान मिळत असल्याने कांदा खरेदीदार जास्तीत जास्त कांदा देशांतर्गत व परदेशात पाठविण्यासाठी प्रयत्न करतील.

सध्या येथील शेतकरी बांधवांना लाल कांद्यासाठी रू . १,००० / – ते १,१०० / – प्रती क्विंटल उत्पादन खर्च येत असून सद्यस्थितीत येथील शेतकरी बांधवांना त्यांचा लाल कांदा सर्वसाधारण रू .८०१ / – प्रती क्विंटल दराने विक्री करावी लागत आहे. सद्यस्थितीत लाल कांद्यास मिळत असलेला सर्वसाधारण दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने येथील शेतक-यांना किमान उत्पादन खर्च मिळावा म्हणून लाल कांदा विक्रीवर रू. ५०० / – प्रती क्विंटलप्रमाणे अनुदान देणेकामी प्रयत्न करण्यात यावा. या मागण्या सुवर्णा जगताप यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT