सोलापूर : डाळिंब संशोधन केंद्र उरले नावापुरते? | पुढारी

सोलापूर : डाळिंब संशोधन केंद्र उरले नावापुरते?

सोलापूर / महूद : दीपक धोकटे :  डाळिंबावर उद्भवणार्‍या तेल्या, मर, खोड भुंगेरा या रोगांच्या प्रादुर्भावामुळे सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी जवळपास 80 टक्के डाळिंब बागा काढून टाकल्या आहेत. डाळिंबाचा पट्टा अशी ओळख सांगोला तालुक्याची असली तरी डाळिंब संशोधन केंद्राची 2005 मध्ये सोलापूर शहरात निर्मिती झाली. मात्र, गेल्या 17 वर्षार्ंत डाळिंब संशोधन केंद्रावर कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी शास्त्रज्ञांच्या हाती काहीच लागले नसल्याचे वास्तव आहे.

तेल्या, मर, पिन होल बोरर अर्थात खोड भुंगेरा या रोगांवर उपाययोजना करण्यात या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना सपशेल अपयश आले. या संशोधन केंद्राचा जिल्ह्यातील शेतीला आणि शेतकर्‍यांना आजपर्यंत किती फायदा झाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या संशोधन केंद्राच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेल्या वीस-बावीस वर्षांपूर्वी जिल्ह्याला नव्हे, तर संपूर्ण राज्याला डाळिंब या पिकाची ओळख करून देणार्‍या सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तेल्या, मर, पिन होल बोरर अर्थात खोड भुंगेरा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाचा पट्टा उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास भयानक रोगाने हिरावून घेतला आहे. केंद्र सरकारने 2005 साली सोलापुरातील केगाव येथे डाळिंब संशोधन केंद्राला मंजुरी दिली. कोट्यवधी रुपये खर्चून शेकडो एकर जागा खरेदी करून सुसज्ज अशी इमारत बांधली. अनेक तज्ज्ञ शास्त्रज्ञांची या ठिकाणी नियुक्ती झाली; परंतु गेल्या 17 वर्षांत डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना तेल्यावर उपाययोजना करण्यात अपयश आले आहे. या संशोधनाचा शेतकर्‍यांना उपयोग झाला का, याची उत्तरे शोधली पाहिजेत.

शेतकर्‍यांच्या या समस्या सोडवण्यासाठी या संशोधन केंद्राचे योगदान किती, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत. पूर्वी कधीतरी झालेले कृषी संशोधन आणि काही चर्चासत्रातील सहभाग वगळता अलीकडच्या काळात तरी हे डाळिंब संशोधन केंद्र अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीला धावून गेल्याचे दिसत नाही.

डाळिंबाचा पट्टा समजल्या जाणार्‍या सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील डाळिंब बागांवर तेल्या, मर आणि खोड भुंगेराने थैमान घातले आहे. या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने हजारो हेक्टरवरील डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना डाळिंब बागा काढून टाकण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही. गेल्या 17 वर्षार्ंत कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील तेल्या रोगावर उपाययोजना करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळत नसेल तर या संशोधन केंद्राचा उपयोग काय, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.

नुकसानग्रस्त भागास भेटी देऊन माहिती सांगितली जाते. मात्र, सांगितलेल्या औषधांचा काहीही परिणाम रोगग्रस्त असलेल्या डाळिंब बागेवर होत नाही. तरी डाळिंब संशोधन केंद्राने बागा वाचविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी.
– दिलीप नागणे
विभागीय संचालक, अखिल भारतीय डाळिंब महासंघ

Back to top button