खानदेश महोत्सव www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

खानदेश महोत्सव : २२ डिसेंबरपासून अनुभवा संस्कृतीचे विविध पैलू

अंजली राऊत

सिडको : पुढारी वृत्तसेवा

खानदेशची संपन्न संस्कृती उलगडणारा खानदेश महोत्सव दि. २२ ते २५ डिसेंबर दरम्यान सिटीसेंटर मॉलजवळील ठक्कर डोममध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजक आ. सीमा हिरे व रश्मी बेंडाळे-हिरे यांनी दिली.

महाराष्ट्राला मुक्ताबाई, साने गुरुजी, बहिणाबाई, बालकवी, भालचंद्र नेमाडे, केकी मूस, ना. धो. महानोर, प्रतिभाताई पाटील यांच्यासारखे महान व्यक्तिमत्त्व देणाऱ्या खानदेशला अतिशय संपन्न आणि वैभवशाली संस्कृती लाभली आहे. खानदेशची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती खानदेश महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे. आमदार हिरे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या चारदिवसीय सांस्कृतिक महोत्सवात नाशिकककरांना खानदेशच्या अद्वितीय संस्कृतीचे विविध पैलू अनुभवता येतील. अहिराणी बोलीतील लोकसाहित्य, खानदेशाचा साहित्यिक वारसा, लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृतीचा प्रचार, प्रसार करणे, खानदेशमधील प्रतिभावंतांच्या सहभागाने सक्रिय व्यासपीठाची निर्मिती, खाद्य संस्कृती, खानदेशातील प्रेक्षणीय स्थळांच्या पर्यटनवृद्धीसाठी विशेष उपक्रम, खानदेशमधील उद्योजकांना उत्पादित मालाच्या विक्रीसाठी नवीन पर्याय या महोत्सवातून उपलब्ध केेला जाणार आहे. महोत्सवात अहिराणी साहित्य व कवी संमेलन, महिलांसाठी भजन स्पर्धा, न्यू होम मिनिस्टर, चला पैठणी जिंकू या व फॅशन शो, टॅलेंट शो व डान्स कॉम्पिटिशन, लोककला व लावणी महोत्सव, सुप्रसिद्ध गायकांची शानदार मैफल तसेच खानदेशरत्न पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी सिडकोतून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत पारंपरिक नृत्य, कानबाई उत्सव, गोंधळी नृत्य, लेझीम पथक, डोंगर देव तसेच संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या प्रतिकृतींचे प्रदर्शन होणार आहे. याही वर्षी समाजातील अनेक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, क्रीडापटूंना खानदेश रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. याही वर्षी हा पुरस्कार सोहळा होणार असल्याचे स्टॉल बुकिंगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी केले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT