सासवड : अंजीर शेतीतून शेतकर्‍यांनी समृद्ध व्हावे | पुढारी

सासवड : अंजीर शेतीतून शेतकर्‍यांनी समृद्ध व्हावे

सासवड; पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकूण 2800 हेक्टर अंजीर क्षेत्र असून यातील 1100 हेक्टर एकट्या पुरंदरचे आहे. जमिनीची सुपीकता, दर्जेदार पॅकिंग यंत्रणेचा वापर व जीआय नामांकनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी अंजीर शेतीत आर्थिक समृद्ध व्हावे, असे मत आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.

सासवड (ता. पुरंदर) येथील पांडुरंग भवन येथे अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ पुणे यांच्या सहकार्याने पुरंदर अंजीर या भौगोलिक नामांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रसार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण, नोंदणी अभियान व भौगोलिक नामांकन प्रमाणपत्र 512 शेतकर्‍यांना वाटपाचा प्रारंभ आ. संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

देशभरातील एकूण 129 भौगोलिक नामांकनामध्ये महाराष्ट्राचा 26 विविध नामांकनांसह प्रथम क्रमांक लागतो. त्यामध्ये अंजीर केवळ देशभरातील राज्यनिहाय कृषी उत्पादनास प्राप्त भौगोलिक नामांकन असल्याची माहिती राज्यस्तरीय सल्लागार फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणेचे गोविंद हांडे यांनी दिली.

पुढील काळात जागतिक स्तरावर ओळख मिळवण्यासाठी पीजीआय (प्रोजेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशन) नोंदणी तसेच उत्पादनाच्या विशिष्टतेच्या आधारे किमान गुणवत्ता अंतिम करणे आणि उत्पादनांच्या विपणनासाठी व्यापक प्रसिद्धी आणि प्रशिक्षण या बाबी महत्त्वाच्या आहेत, असे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी सांगितले. यावेळी डॉ. दशरथ ढवाळ, शास्त्रज्ञ युवराज बालगुडे, अंजीर निर्यातदार रोहन उरसळ, कृषी उद्योजक समीर डोंबे, विठ्ठल मोकाशी आदी उपस्थित होते.

Back to top button