ठळक मुद्दे
> प्रफुल्ल लोढाचा जन्म जामनेर तालुक्यामधील पहूर या गावात
> वडील काँग्रेसचे खंदे समर्थक
> 2024 च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर झाले होते तिकीट. आयत्यावेळी माघार
Who is Praful Lodha Involved in Teen Girl Abuse Honeytrap Case:
जळगाव : ‘हनी ट्रॅप’सह अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गोत्यात आलेला प्रफुल्ल लोढा हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. मुंबईतील अंधेरी एमआयडीसी, साकीनाका आणि पिंपरी चिंचवडमधील बावधन पोलीस ठाण्यात प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळात प्रभाव निर्माण करण्यासाठी ओळखी, सल्ला आणि वशिला यांचा वापर करणार्या प्रफुल्ल लोढा याने मागील काही वर्षांत स्वतःचे स्वतंत्र नेटवर्क तयार केले होते. राजकीय पदावर नसतानाही अनेक वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमात त्याची उपस्थिती होती. लोकांना नोकर्या, फायनान्सिंग, आणि गुंतवणूक सल्ला देण्याच्या बहाण्याने तो उच्चभ्रू समाजात वावरायचा. त्याच्या राजकीय जवळकीची चर्चा होती. मात्र, आता गंभीर गुन्ह्यांच्या मालिकेमुळे त्याचे हे सगळे जाळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हा प्रफुल्ल लोढा कोण आहे, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय, त्याची राजकीय कारकीर्द हे जाणून घेऊया...
प्रफुल्ल लोढाचा जन्म काँग्रेस समर्थक कुटुंबात
प्रफुल्ल लोढाचा जन्म जामनेर तालुक्यामधील पहूर या गावातील रामचंद्र लोढा यांच्या घरी झाला. शालेय शिक्षणानंतर लोढा हा पुढील शिक्षणासाठी जामनेरमध्ये गेले. प्रफुल्ल लोढाचे वडील रामचंद्र लोढा, भाऊ सतीश, रायसिंग हे खंदे काँग्रेस समर्थक. मुख्यतः ईश्वर बाबूजी जैन यांचे विश्वासू म्हणून लोढा कुटुंबाला ओळखले जायचे.
काँग्रेसची पार्श्वभूमी असली तरी प्रफुल्ल लोढा हा बंडखोर स्वभावाचा होता. वडील रामचंद्र यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. या पारंपारिक व्यवसायापेक्षा काही तरी वेगळे करायचे, असं प्रफुल्ल त्याच्या मित्रमंडळींना सांगायचा. दुसरीकडे त्याला दारूचे व्यसनही जडले यामुळे कुटुंबियांना मनस्तापाचा सामनाही करावा लागला होता.
प्रफुल्ल लोढाची मुलं काय करतात?
प्रफुल्ल लोढाला दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांचे गॅस एजन्सी, बांधकाम, इलेक्ट्रीक असे विविध व्यवसाय आहेत. नुकतेच लोढा कुटुंबाने एक मोठे व्यापारी संकुलही विकत घेतले होते. हे सर्व व्यवसाय प्रफुल्ल लोढाची मुलं सांभाळतात.
प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजनांच्या संपर्कात कसा आला?
गिरीश महाजन हे पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीत उतरले ते जामनेरमधून. 1995 मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली. याच कालावधीत प्रफुल्ल लोढा हा महाजन यांच्या संपर्कात आला. हळूहळू त्याने महाजनांचा विश्वासही संपादन केले. गिरीश महाजन यांनी आमदार झाल्यावर आरोग्य दूत उपक्रम राबवला. जळगाव भागातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यासंदर्भातला हा उपक्रम होता. या उपक्रमात प्रफुल्ल लोढा हा सक्रीय होता असे समजते.
प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांच्यात वाद काय झाला?
लोढा- महाजन यांच्यातला नेमका वाद काय हे कोणालाही माहिती नाही. पण महाजन यांच्याशी मतभेद झाल्यानंतर लोढाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2020 - 21 मध्ये प्रफुल लोढाने पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गिरीश महाजन यांनी मला सल्ले देऊ नये, मी जर एक बटण दाबले तर देशभरात खळबळ माजेल. पण यात पाच 25 निरपराध लोकांचे बळी जातील म्हणून मी शांत असल्याचा दावा लोढा यांनी केला होता. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात एका सीडीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील प्रफुल्ल लोढाचा 2020- 21 मधील व्हिडिओ पोस्ट करत महाजनांवर निशाणा साधला होता.
प्रफुल्ल लोढा कोणकोणत्या राजकीय पक्षात होता?
प्रफुल्ल लोढाच्या राजकीय कारकीर्दीला भाजपपासून सुरूवात झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी आणि भाजपाची सत्ता आल्यानंतर पुन्हा भाजपात प्रवेश केला.
2024 च्या निवडणुकीमध्ये त्याला वंचित बहुजन आघाडीकडून तिकीटही जाहीर झाले होते. मात्र ऐनवेळी त्याने माघार घेतली होती.