जळगाव

मृत्यूच्या दाढेत ५० जीव! ब्रेक निकामी झाल्याने बस ३ किमी धावली; महामार्गावर थरार

Jalgaon accident | एरंडोल जवळील धारागीर येथे धुळे-भुसावळ एसटीला भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एरंडोल तालुक्यातील धारागीर गावाजवळ धुळे-भुसावळ एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. बस अनियंत्रित झाल्याचे लक्षात येताच चालकाने ५० प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी तब्बल ३ किलोमीटरपर्यंत बसवर ताबा मिळवण्याची झुंज दिली. अखेर रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला बस धडकल्याने मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेत १० ते १५ प्रवासी जखमी झाले असून चालक-वाहकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-भुसावळ बस क्रमांक एम एच 34 बी एल 3412 यामध्ये ५० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक बसचे ब्रेक निकामी झाले. महामार्गावर बस सुसाट वेगाने धावत असताना चालक आणि वाहकाच्या हे लक्षात आले. चालकाने समयसूचकता दाखवत इंजिन गिअरच्या साह्याने बस थांबवण्याचा प्रयत्न केला. सुमारे ३ किलोमीटरपर्यंत चालकाची ही धडपड सुरू होती. दरम्यान, बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना धोका लक्षात येताच एकच आक्रोश आणि आरडाओरड सुरू झाली.

अखेर ही अनियंत्रित बस धारागीर गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की बसची चाके निखळून पडली. या अपघातात १० ते १५ प्रवाशांना दुखापत झाली असून, बसचे चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालक आणि वाहकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने, चालकाच्या धाडसामुळे मोठा जीवघेणा प्रसंग टळला असला तरी ५० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.

भररस्त्यात ब्रेक फेल होणे ही एसटी महामंडळाच्या मेंटेनन्स विभागाची मोठी चूक आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई होणार का? जळगाव जिल्ह्यात एसटीच्या अपघातांचे सत्र कधी थांबणार? उपप्रादेशिक परिवहन विभागाने अशा जुन्या बसेसची तपासणी कधी केली होती? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT