Unmesh Patil Viral Clip Vs Mangesh Chavan Jalgaon Politics
सुशांत सावंत, पुढारी न्यूज
मुंबई : महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून 'अपना सिर्फ एक अजेंडा है, bjp के खिलाफ काम करना है', असे ते क्लिपमध्ये म्हणताना ऐकू येत आहे. या क्लिपवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आक्षेप घेत याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू, असा पवित्रा घेतला आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून खासदारकी लढवलेले उन्मेष पाटील हे शुक्रवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांची सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. उन्मेष पाटील यांनी मुस्लिम समाजातील एका कार्यकर्त्याला कॉल केला असून या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
उन्मेष पाटील कार्यकर्त्याला म्हणाले, पठाणभाई मी उन्मेष बोलतोय. सहा मार्चला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपल्याला प्रवेश करायचा आहे. सायगावमधून किती गाड्या हव्यात हे सांगा, आपला अजेंडा स्पष्ट आहे, आपल्याला भाजपच्या विरोधात काम करायचं आहे.
भाजपची आक्रमक भूमिका
उन्मेष पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच भाजपचे जळगावमधील आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘शिंदेंनी कोणाला प्रवेश द्यावा हा त्यांचा विषय आहे. मात्र 'आपला अजेंडा क्लिअर आहे भाजपला दाबायचंय हे नेमकं काय’, असा सवाल चव्हाण यांनी विचारला आहे. आम्ही यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोण आहेत उन्मेष पाटील?
उन्मेष पाटील हे जळगावमधील वजनदार नेते आहेत. 2014 मध्ये ते चाळीसगावमधून आमदार आणि 2019 मध्ये ते जळगावमधून खासदार म्हणून निवडून आले. 2024 मध्ये त्यांना पुन्हा लोकसभेचे तिकीट हवे होते, मात्र भाजपने त्यांचे तिकीट कापले. यामुळे नाराज झालेले उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेत गेले. यात भाजप उमेदवाराकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अवघ्या दीड वर्षांत उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाची मशाल सोडून शिंदेंचे धनुष्यबाण हाती घेण्याची तयारी केली आहे.
उन्मेष पाटील यांच्यावर बँकेतून 5 कोटी 33 लाखांचे कर्ज घेतल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. नुकतीच त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने त्यांनी सत्ताधारी गटात प्रवेश केला की काय, अशी चर्चा जळगावच्या राजकारणात रंगली आहे.