जळगाव

तृतीयपंथीयांकडे ‌’माणुस’ म्हणून पहायला आणि जगवायला हवे : साहित्य संमेलन परिसवांदातील सुर

गणेश सोनवणे

सानेगुरूजी साहित्य नगरी (जि. जळगाव) : तृतीयपंथीयांकडे नेहमी नकारात्मकतेने पाहिले जाते. त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्याची गरज आहे. आता त्यादृष्टीने शासनाने पाऊल टाकले आहे. आता समाजानेही तृतीयपथीयांविषयीची नकारात्मक भूमिका आणि भावना सोडून त्यांना मूळ प्रवाहात सामावून घ्यावे. तृतीय पंथीय जगले, प्रवाहात आले तर साहित्यांची निमिर्ती होईल, असा सूर 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादातून निघाला.

कविवर्य ना.धो महानोर सभागृहात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, अतीय मराठी साहित्य महामंडळ व जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादाला रसिकांसह मराठी सारस्वतांसह महिलांची उपस्थिती लक्ष्ाणिय होती. सभागृह श्रोत्यांनी फुल्ल भरले होते. परिसंवादाचे संवादक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी काम पाहिले तर यात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, बिंदुमाधव खिरे, शमिभा पाटील, डॅनियल्ला मॅक्डोन्सा, विजया वसावे, प्रनीत्त गौडा यांनी सहभाग घेतला होता.

परिसंवादाची सुरवात करताना डॉ. दीपक पवार यांनी वंचितांपलिकडे असलेल्यांसाठी आजचा हा परिसंवाद घेत त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे दुसरे पाऊल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने केले असल्याचे सांगत साहित्य मंडळाचे अभिनंदन केले.

निवडणूकीच्या पलीकडेचे तृतीयंपथीयांचे प्रश्न : श्रीकांत देशपांडे

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाहीत निवडणूकीस जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्व लोकशाहीतील मूल्यांना आहे. निवडणूकीच्या निमित्ताने तृतीयपंथीयांचा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा हा प्रश्न केवळ निवडणूकीपुरता मर्यादीत नाही. तर त्यापलिकडचे अनेक प्रश्न असल्याचे समोर आले. तृतीयंपंथीयांचे जगण्याचे, शिक्ष्ाणाचे, आरोग्याचे, नोकरीचे असे अनेक प्रश्न आहेत. यांतून वाट काढत आता निवडणूक आयोगाने या तृतीय पंथीयांना कोणतेही कागदपत्रे न घेता मतदार कार्ड वितरीत केले आहे. त्यांना रेशनकार्डही देत समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यास सुरवात केली आहे. भाषेच्या साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटते. तर समाजात लोकांचे प्रतिबिंब उमटत असल्याचे सांगीतले.

तृतीय पंथीय म्हटले की लिंग, लिंगभाव व लैंगिगकता असे विविध विचार मनात डोकावतात. परंतु हे तिनही शब्द व त्यांचे अर्थही वेगवेगळे आहे. तृतीयपंथीय हे अचानक आलेले नाहीत. जन्मत: त्यांच्या शरीरात बदल होत असतात. त्यानुसार मेंदू हा पुरूषाचा तर कधी स्त्रीचा किंवा कधी मेंदू स्त्रीचा तर शरीर पुरूषाचे अशी रचना होत असते. अशा शरीररचनेत कोणत्याही उपचाराने बदल करता येत नाही. बिंदुमाधव खिरे म्हणाले की, तृतीयपंथीय समुदायाचे साहित्यातील व समाजातील स्थान समजून घेताना लिंग, लिंगभाव व लैंगिकता या शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत.

पुनीत गौडा म्हणाले की, पारलिंग पुरुष जन्माने स्त्री असतो. मात्र, मनाने तो पुरुष असतो. त्यांचे मन पुरुषाप्रमाणे घडत असते. डैनियल मॅक्डोन्सा म्हणाल्या की, माणसाला माणसाप्रमाणे वागविण्यासाठी धर्माची गरज पडत नाही. तृतीयपंथीय व्यक्तींचे मन समाजाने समजून घेतले पाहिजेत.

शमिभा पाटील म्हणाल्या की, पारलिंगी समुदायाचे साहित्यात चित्रण जास्त झाले नाही. अण्णा भाऊ साठे यांच्यानंतर अनेक वर्षांचा कालखंडात लिखाण झाले नाही. स्वाती चांदोरकर, दिशा पिंकी शेख, लक्ष्मी, पारू, मदन नाईक, नागा किन्नरी यांनी पारलिंगी समुदायाचे चित्रण त्यांच्या पुस्तके व कवितांतून मांडले आहे.

तृतीयपंथीय समुदायाची स्वतःची भाषा असते. तृतीयपंथी समाज आता समाजमाध्यमातून लिहायला लागला आहे. साहित्यविश्वाने आमच्या जगण्याचे प्रश्न मांडले पाहिजेत, अशी अपेक्षाही शमिभा पाटील यांनी व्यक्त केली.

विजया वसावे यांनी वनरक्षक भरतीत त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले.

निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही शासनव्यवस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून ती रसरशीत होणेही तितकेच महत्त्वाचे असते. या अनुषंगाने मराठी साहित्यात तृतीयपंथी समुदायाचे चित्रण झाले आहे का, ते कशा प्रकारे केले गेले आहे, ते करताना लोकशाही, सांविधानिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटले आहे का, त्यांच्यापर्यंत लोकशाही पोहोचली आहे का, ती पोहोचण्यासाठी काय करता येईल, अशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंवादात करण्यात आली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT