Honey Trap Case Maharashtra
जळगाव : जिल्ह्यात सध्या 'हनी ट्रॅप' प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मंत्री महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा एकत्र फोटो ट्विट करत गंभीर आरोप केले. त्यानंतर महाजन यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, प्रफुल्ल लोढा हा केवळ भाजपच नव्हे, तर अनेक पक्षांत सक्रिय होता. "लोढा यांचे शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासोबतही फोटो आहेत. मग या सर्व नेत्यांचा हनी ट्रॅपशी संबंध आहे का? त्यांचीही सीबीआय किंवा एसआयटी चौकशी करायची का?" असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये लोढा यांचे विविध नेत्यांसोबतचे फोटो दाखवत, केवळ भाजपवरच बोट ठेवणे चुकीचे असल्याचे सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यावर महाजन यांनी प्रत्युत्तर देताना, "खडसे हे लोढा यांच्या चौकशीची मागणी करत आहेत, पण काही वर्षांपूर्वी लोढा यांनी खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्या वेळी मी खडसे यांच्या सोबत होतो. मग आता त्या प्रकरणाचीही चौकशी करायची का?" असा प्रतिप्रश्न केला.
महाजन यांनी खडसे यांना उद्देशून, "मी एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही, पण त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कोणत्याही प्रकरणात मीच त्यांना दिसतो," अशी टीका केली. तसेच, "खडसे माझ्या नावाशी प्रत्येक प्रकरण जोडून माझी बदनामी करतात," असा आरोपही त्यांनी केला.
एकनाथ खडसे यांनीही स्पष्ट केले की, प्रफुल्ल लोढा हा काही वर्षांपूर्वी सामान्य कार्यकर्ता होता, मात्र राजकीय संबंधांमुळे अल्पावधीतच कोट्यवधींचा मालक झाला. लोढा आणि महाजन यांचे पूर्वी घनिष्ठ संबंध होते, मात्र नंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. लोढा यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले, तसेच खालच्या भाषेत टीका केली, असे खडसे यांनी सांगितले.
प्रफुल्ल लोढा यांना पोलिसांनी अटक केली असून, तपास सुरू आहे. "पोलीस चौकशी करतील आणि सत्य समोर येईल," असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणाच्या निमित्ताने जळगावच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून, अनेक नेत्यांचे जुने संबंध, आरोप आणि प्रत्यारोप पुन्हा चर्चेत आले आहेत.