

मुंबई: "सध्याचे सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारे असून, त्यांचे चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत," असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हनी ट्रॅपच्या सूत्रधाराचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवत, राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी याच हनी ट्रॅपचा वापर झाल्याचा गंभीर आरोप केला. संजय राऊत यांनी आज (दि.२१) पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर हल्ला चढवला. राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, मंत्र्यांचे वर्तन आणि हनी ट्रॅपचे राजकारण यावर त्यांनी जोरदार टीका केली.
राऊत यांनी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत, तोच या हनी ट्रॅपचा सूत्रधार असल्याचा दावा केला. "या प्रफुल्ल लोढाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो आहेत. याची सूत्रं जामनेर, जळगावपासून दिल्लीपर्यंत पोहोचली आहेत. फडणवीसांनी लोढाचा पेन ड्राईव्ह शोधावा, त्यात भाजपचेही दोन मंत्री सापडतील," असे आव्हान एक्स पोस्टवरून राऊत यांनी दिले
महाविकास आघाडीतून फुटलेल्या खासदारांवरही हनी ट्रॅपचा वापर झाल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. ते म्हणाले, "आमचे जे खासदार फोडले, त्यात ईडी, सीबीआयसोबतच चार खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते. त्यांना सीडी दाखवून ब्लॅकमेल केले आणि मग पक्षात घेऊन त्यांचे शुद्धीकरण करण्यात आले."
"हे सरकार आधी घटनाबाह्य होते, आता ते अनैतिक झाले आहे," अशी टीका करत राऊत यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "कायद्याची पदवी म्हणजे सुसंस्कृतपणा नाही. आडनाव फडणवीस असले तरी संस्कार दिसत नाहीत. काल खासदार सुनील तटकरेंच्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली, मंत्र्यांच्या बारमधून महिला सापडतात, पण भाजपच्या महिला नेत्या आता गप्प का आहेत?" राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. "एकनाथ शिंदेंना भविष्य आहे का? भाजपला आता त्यांचे ओझं झालं आहे," असे म्हणत त्यांनी या आरोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याचे संकेत दिले आहेत.