आषाढी एकादशी : पिप्राळ्यात निघाला रथ; उताराच्या रस्त्यावर रथाची दोन चाके उतरली  Pudhari Photo
जळगाव

आषाढी एकादशी : पिप्राळ्यात निघाला रथ; उताराच्या रस्त्यावर रथाची दोन चाके उतरली...

पुढारी वृत्तसेवा

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा

आषाढीनिमित्त जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. शहर आणि जिल्‍ह्यातील अनेक विठ्‍ठल मंदिरे सजविण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे जळगाव शहरातील पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्‍सवाचे आयोजन करण्यात आले होते. रथ रस्त्याने मार्गाक्रमण होत असताना सिमेंटच्या उताराच्या रस्त्यावरून जात होता. यावेळी रथ अनियंत्रित होऊन रथाची दोन्ही चाके रस्त्याच्या खाली उतरली. हा रथ पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी जवळपास दीड तासांचा अवधी लागला. त्यानंतर रथयात्रा सुरळीत पार पडली.

आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर पिंप्राळ्यात रथोत्सव संपन्न

विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळ व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील पिंप्राळा येथे आषाढी एकादशी निमित्ताने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पिंप्राळा येथील रथोत्सवाला १४९ वर्षांची परंपरा आहे.

या रथोत्सवानिमित्त पहाटे ५ वाजता श्रध्दा व अक्षय प्रमोद वाणी यांच्या हस्ते विठ्ठल रखूमाई यांचा महाअभिषेक करून पूजन करण्यात आले. सकाळी ७ वाजता शुभांगी व महेश पंढरीनाथ वाणी, रुपाली व भगवान हिरालाल वाणी यांच्या हस्ते अभिषेक व पूजन केले. यावेळी रथावर विराजमान होणारी राधा-कृष्णाची मूर्ती, अर्जून, घोडे, गरूड व हनुमान यांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. तद्नंतर पांडूरंग भजनी मंडळाकडून मंदिरामध्ये टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग, गवळणीं झाली.

सकाळी ११.३० वाजता राधा कृष्णांची मूर्ती रथावर विराजमान होऊन व त्यानंतर मंदिराच्या पूजारी शाम जोशी यांच्या मंत्रोपचाराने विजया व कुलदीप अशोक पंडीत यांच्या हस्ते विधीवत पूज अर्चा झाली. दुपारी १२.३० वाजता वाणी समाजाच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते रथाची महापूजा केली गेली. ही महापूजा झाल्यानंतर रथ मिरवणुकीला सुरुवात झाली.

रथाचा मार्ग हे सिमेंट काँक्रीटचे रस्ते झालेले असल्याने व त्यात उतार आल्याने रथावरील नियंत्रण सुटले. यामुळे रथाची दोन चाके रस्त्याच्या खाली उतरली. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. ग्रामस्थ व नागरिकांनी प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. शेवटी दोन जेसीबीच्या सहाय्याने रथ मुख्य रस्त्यावर आणण्यात आला व त्यानंतर रथयात्रा संपन्न झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT